Kolhapur: ना शाळेचा गणवेश, ना कोणतेही बंधन; विद्यार्थ्यांनी चिखल महोत्सवात उडवली धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 18:06 IST2023-07-17T18:05:36+5:302023-07-17T18:06:10+5:30
शिक्षकही या खेळात मुलांबरोबर सहभागी झाले होते

Kolhapur: ना शाळेचा गणवेश, ना कोणतेही बंधन; विद्यार्थ्यांनी चिखल महोत्सवात उडवली धमाल
उत्कर्षा पोतदार
उत्तूर : ना शाळेचा गणवेश, ना कोणतेही बंधन. आवडेल तो खेळ आपल्याला हवा तेवढा वेळ खेळत राहायचं अन् तोही चिखलात. अशीच चिखलात माखलेली विद्यार्थी दंग होवून धमाल उडवत होती आगळ्या वेगळ्या चिखल महोत्सवात. उत्तूर विद्यालयात हा आगळावेगळा 'चिखल महोत्सव' आज सोमवारी (ता. १७) साजरा करण्यात आला. या महोत्सवात फुटबॉल, रस्सीखेच, घसरगुंडी व कबड्डी असे पारंपारिक खेळ खेळण्यात आले. शिक्षकही या खेळात मुलांबरोबर सहभागी झाले होते.
दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे, विद्यार्थ्यांनी रांगडे खेळ खेळावेत या हेतूने दरवर्षी पावसाळ्यात उत्तूर विद्यालयात चिखल महोत्सव साजरा करण्यात येतो. शाळेसमोरील मैदानात चिखल तयार करून त्यामध्ये विद्यार्थी मनसोक्त खेळतात. मुलींसाठी व मुलांसाठी वेगवेगळ्या चिखलाचे मैदान तयार केले जाते. विद्यार्थी आपल्याला आवडेल तो खेळ आपल्याला हवा तेवढा वेळ खेळत राहतात. शिक्षकही या खेळात मुलांबरोबर सहभागी होतात. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमधील निर्माण झालेली दरी कमी व्हायला मदत होते. डोक्यापासून पायापर्यंत सर्वजण चिखलाने माखलेले असल्याने विद्यार्थी एकमेकांना न ओळखताही खेळात दंग होते.
मुख्याध्यापक शैलेंद्र आमणगी यांनी मातीत खेळल्यामुळे विद्यार्थ्यांची लोहाची कमतरता भरून येते असे सांगितले. लोकमतच्या उत्तूर प्रतिनिधी उत्कर्षा पोतदार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. शिक्षिका उमाराणी जाधव म्हणाल्या, विद्यार्थी सध्या मातीत खेळत नाहीत. फक्त मोबाईल, टीव्ही व पुस्तके यातच गुंग असतात. त्यामुळे त्यांचे मातीशी असेल नाते दृढ व्हावे यासाठी अशा चिखल महोत्सवाची गरज आहे. कविता व्हनबट्टे यांनी आभार मानले.