महावितरण कंपनीचा आजऱ्यात ग्राहकांना ‘शॉक’
By Admin | Updated: July 10, 2017 23:28 IST2017-07-10T23:28:36+5:302017-07-10T23:28:36+5:30
अनागोंदी कारभार थांबणार तरी कधी ? : घरगुती वापराचे एका महिन्याचे वीज बिल ८४९० रुपये

महावितरण कंपनीचा आजऱ्यात ग्राहकांना ‘शॉक’
कृष्णा सावंत । लोकमत न्यूज नेटवर्क--पेरणोली : आजऱ्यातील महावितरणच्या शाखेच्या सातत्याने येणाऱ्या कृषिपंप व घरगुती बिलाच्या भरमसाट वाढीव बिलाला ग्राहक कंटाळला असून, या शाखेचा अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अनागोंदी कारभार थांबणार तरी कधी, अशी विचारणा तालुक्यातील ग्राहकांमधून होत आहे.अनेक वर्षांपासून महावितरणच्या वीज बिलामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. अनेकदा वीज ग्राहकांनी तक्रार करूनही त्याचे निरसन झालेले नाही. तात्पुरती दुरुस्ती केली जाते. पुन्हा भरमसाट बिल येते. ही परिस्थिती तालुक्यात सर्वत्र असल्याने ग्राहकांमधून आजरा महावितरणच्या शाखेच्या कामकाजाविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.हरपवडे येथील धनाजी पाटील यांचे महिन्याचे घरगुती बिल सर्वसाधारण येते. मात्र, गेल्या महिन्यात एका महिन्याचे बिल ८४९० रुपये आल्याने पाटील यांनी आजरा येथील महावितरण शाखेच्या कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र, तक्रार करूनही तुमचे बिल जेवढे आहे तेवढेच भरावे लागणार असल्याची दमदाटीही दिल्याने
पाटील घरी परतले. पत्नी सरपंच असलेल्या घराला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.कृषिपंपाचे वीज बिलही अॅव्हरेजनुसार काढण्यात येत आहे. रीडिंगप्रमाणे बिल आकारल्यामुळे तीन एचपीच्या ग्राहकाला पाच ते सात एचपीच्या कृषिपंपाएवढे वीज बिल येत आहे. त्यामुळे कृषिपंपाचीही भरमसाट बिले येत असल्याने रीडिंगप्रमाणे वीज बिल आकारण्याची मागणी होत आहे.
घरगुती बिल ८४९० रुपये आल्याने मीटर दुरुस्तीसाठी कार्यालयात गेलो असता मलाच उलट प्रश्न विचारण्यात आले. सर्वसामान्यांना कार्यालयाकडून समाधानकारक उत्तरे व वागणूक दिली जात नाही.
- धनाजी पाटील, घरगुती वीजग्राहक
कृषिपंपाचे वीज बिल अॅव्हरेजनुसार काढण्यात येत असल्याने छोट्या शेतकऱ्यांना विनाकारण भरमसाट बिल भरावे लागत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही निवारण झालेले नाही.
- अजित सावंत, कृषिपंप ग्राहक, आजरा.