कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नात खासदार शाहू छत्रपती यांनी लक्ष घालून पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या सर्व नेत्यांशी लवकरच ते चर्चा करणार असून, त्यानंतर समर्थक व विरोधक यांचीही एकत्रित बैठकही घेणार आहेत. हा प्रश्न सर्वांना एकत्र आणून समन्वयाने, सुसंवादाने आणि शांततेच्या मार्गानेच सोडविला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.सोमवारी कोल्हापूर शहर सर्व पक्षीय हद्दवाढ कृती समितीने न्यू पॅलेस येथील कार्यालयात जाऊन खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेऊन या प्रश्नात आपण लक्ष घालावे आणि कोल्हापूरकरांना न्याय द्यावा, अशी विनंती केली.हद्दवाढीचा प्रश्न केव्हापासून प्रलंबित आहे, हद्दवाढ न झाल्यामुळे निर्माण झालेले नागरी प्रश्न, आमदारांची भूमिका, सरकारची चालढकल, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या भूमिका याबाबतची माहिती आर. के. पोवार, बाबा इंदूलकर यांनी दिली.महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी हद्दवाढ मागत नाही तर शहरवासीयांचा श्वास घुसमटत असल्यामुळे आम्हाला हद्दवाढ पाहिजे असल्याचे इंदूलकर यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वी हद्दवाढ झाली नाही तर पुढील अनेक वर्षे रेंगाळणार असल्याचे पोवार यांनी सांगितले. आम्हाला सगळ्यांनीच फसविले आहे, आता शाहू छत्रपतींनी या विषयात लक्ष घालावे आणि न्याय द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, दिलीप पवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे, किशोर घाटगे, अनिल घाडगे, अशोकराव भंडारे, राजू जाधव, सुभाष देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कृती समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
लबाड शब्दावर आक्षेपमाजी नगरसेवक अशोक भंडारे यांनी राज्यकर्ते लबाड असल्याचे आरोप केला. त्यावेळी शाहू छत्रपती यांनी त्यांना ‘तुम्ही आताच त्यांना लबाड म्हणायला लागला तर तुमचा प्रश्न कसा सुटणार,’ असा सवाल केला. त्यावेळी शिष्टमंडळातील अन्य सदस्यांनी बाजू सावरून घेताना ‘महाराज साहेब ही त्यांची भावना आहे, ती त्यांनी व्यक्त केली’ असे स्पष्टीकरण दिले.
आंदोलन तीव्र करण्याचा इशाराराजकारणी आमची बाजू घेत नाहीत, सरकार काही निर्णय घेत नाही. त्यामुळे आमच्या नाकातोंडात पाणी जायला लागले आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका अनेक सदस्यांनी मांडली.