आता पतसंस्था, सोसायटीत ‘सिबिल’ सक्ती; सहकार विभागात हालचाली
By राजाराम लोंढे | Updated: April 28, 2025 15:10 IST2025-04-28T15:10:27+5:302025-04-28T15:10:55+5:30
थकबाकीचे प्रमाण वाढल्याने बँकांच्या धर्तीवर विचार

आता पतसंस्था, सोसायटीत ‘सिबिल’ सक्ती; सहकार विभागात हालचाली
राजाराम लोंढे
कोल्हापूर : राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांप्रमाणे सहकारी पतसंस्था, क्रेडिट सोसायटींना कर्जवाटप करताना सिबील रिपोर्टची सक्ती करण्याच्या हालचाली सहकार विभागात सुरू आहेत. कर्जवाटपाच्या स्पर्धेमुळे संस्थेत येईल त्याला कर्ज दिले जात असल्याने थकबाकीचे प्रमाण वाढल्याने या संस्था अडचणीत येतात आणि मग ठेवीदारांची ससेहोलपट होते. यासाठी, बँकाप्रमाणे येथेही सिबील रिपोर्टची सक्ती करण्याबाबत विचार सुरू आहे.
वित्तीय संस्थांमध्ये कर्जदाराची निवड चुकली तर संस्था डबघाईला येण्यास वेळ लागत नाही. हे ओळखूनच रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँका व नागरी सहकारी बँकांमध्ये कर्ज देताना त्याचा ‘सिबिल रिपोर्ट’ पाहण्याची सक्ती केली. सुरुवातीच्या काळात बँकांनी त्याकडे दुर्लक्ष केले, पण थकबाकीचा टक्का वाढल्यानंतर २०१५ पासून सर्वच बँका सिबिल रिपोर्टचे पालन करत आहेत.
पतसंस्था, क्रेडिट सोसायटीमध्ये सिबील रिपोर्ट बंधनकारक नसल्याने येईल त्याला कर्ज दिले जाते. त्यातून थकबाकी वाढते आणि ठेवेदार अडचणीत येतो. यासाठी, पतसंस्था, क्रेडिट सोसायटींना सिबील रिपोर्टची सक्ती करण्याबाबत सहकार विभागात गांभीर्याने चर्चा सुरू झाली आहे.
‘सिबिल रिपोर्ट’ म्हणजे काय?
सिबिल स्कोअर ३०० ते ९०० अंकांपर्यंत असतो. यादरम्यान असलेला आकडा तुम्ही कर्ज घेण्यास योग्य व्यक्ती आहात की नाही हे ठरतं. किमान ७०० च्या वर आपला सिबिल रिपोर्ट असणे गरजेचे आहे. यापूर्वी घेतलेच्या कर्जाची परतफेड कशी केली, यावर आपला सिबील रिपोर्ट ठरतो.
सिबिल रिपोर्टसाठी ही काळजी घ्या...
- कोणत्याही कर्जाचा हप्ता वेळेवर भरा
- मुदतपूर्व कर्ज भरले तरी तुमच्या सिबिलवर परिणाम होतो, पण हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो
- क्रेडिट कार्ड मर्यादा ३० टक्क्यांपेक्षा कमी रक्कम वापरावी, अन्यथा सिबिल स्कोअरवर परिणाम होतो.
- क्रेडिट कार्ड बंद केल्यानंतर तुमचा क्रेडिट वापर गुणोत्तर वाढतो, सिबिल स्कोअर कमी होतो.
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील वित्तीय संस्था -
- सर्व प्रकारच्या सहकारी संस्था - १२,२५६
- ‘पदुम’ संस्था - ६२६१
- इतर संस्था - ५२३१
- पैकी वित्तीय संस्था - १७६४
- वित्तीयमध्ये पतसंस्था - १७२२
सिबिल रिपोर्टची अट महत्त्वाची असून, त्यामुळे कर्जाची गुणवत्ता वाढते. बँकांप्रमाणे सहकार विभाग पतसंस्थांबाबत वचार करत आहे. - अनिल नागराळे (बँकिंगतज्ज्ञ)
एकाच व्यक्ती दोन पतसंस्थांतून कर्ज उचल केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढते. यासाठी पतसंस्थांना सिबील रिपोर्ट सक्ती करावी. - दामोदर गुरव (अध्यक्ष, आनंदराव गुरव पतसंस्था, पोहाळे)