नाद खुळा! गिर्यारोहक कस्तुरी सावेकरचे जल्लोषात स्वागत, कोल्हापूरकरांकडून यथोचित सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 15:11 IST2021-10-06T15:09:09+5:302021-10-06T15:11:08+5:30
Mountaineer Kasturi Savekar : सर्वात कमी वयात भारतातील माउंट मनस्लू शिखर सर करण्यात कस्तुरी यशस्वी ठरली.

नाद खुळा! गिर्यारोहक कस्तुरी सावेकरचे जल्लोषात स्वागत, कोल्हापूरकरांकडून यथोचित सन्मान
कोल्हापूर : जगातील १४ अष्टहजारी शिखरांपैकी एक अती अवघड असणारे माउंट मनस्लू हे कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर (Kasturi Savekar) या रणरागिनीने सर करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी पुतळा येथे बुधवारी तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सर्वात कमी वयात भारतातील माउंट मनस्लू शिखर सर करण्यात कस्तुरी यशस्वी ठरली. आज तिचे स्वागत करण्यासाठी कोल्हापुरातील गिर्यारोहण संस्थेचे पदाधिकारी व करवीर नगरीतील नागरिक मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.
कस्तुरी गिर्यारोहणात एक उंच झेप घेऊन कोल्हापूर नगरीत परतली. तिच्या चेहऱ्यावर जो उत्साह होता तो हिमालयाच्या उंची सारखा होता. तिचे पाऊल करवीर नगरीतील छत्रपती ताराराणी पुतळा चौक येथे पडताच तुतारीचा निनाद आणि टाळ्यांचा कडकडाट... अशा भारावलेल्या वातावरणात स्वागत झाले. यावेळी छत्रपती ताराराणी यांचा साक्षीने कोल्हापूरकरांनी रोपटे, हार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
छत्रपती ताराराणी यांना वंदन करून फुलांनी सजवलेल्या जीपमधून कस्तुरी दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज पुतळा यांना अभिवादन करण्यासाठी निघाली. वाटेत अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यानंतर राजश्री शाहू महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांना पुष्पहार अर्पण करून माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा दृढ निश्चय केला. यावेळी तिचे वडील दीपक सावेकर व आई मनस्विनी सावेकर या दोघांनाही आनंद अश्रू आवरता आले नाहीत.
कोल्हापूर महानगर पालिकेच्या उपायुक्त दरेकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. अमर अडके यांनी मोहिमेची माहिती दिली. दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुखें यांनी प्रास्ताविक केले. तसेच, पंडीत पोवार, हेमंत साळोखे, अरविंद कुलकर्णी, डॉ जे. एफ. पाटील, उद्योजक प्रसाद कामत, उमेश पोवार, शिवसेना शहर प्रमुख जयवंत हारूगले यांनी कस्तुरीला शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस आशिर्वाद दिले. या कार्यक्रमास करवीर हायकर्सचे संतोष कांबळे, उमेश कोडोलीकर, तेजस सावेकर, विक्रम कुलकर्णी, अनिल भोसले, आनंदा डाकरे, विजय मोरे, उदय निचिते उपस्थित होते.