नेपाळमध्ये हिंसाचार; कोल्हापूर जिल्ह्यातील ५०० हून अधिक पर्यटकांनी प्लॅन केला रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 18:23 IST2025-09-11T18:22:53+5:302025-09-11T18:23:17+5:30
नेपाळसाठी का मागणी

संग्रहित छाया
कोल्हापूर : नेपाळमधील सुंदर मंदिरे, स्वच्छता अन् एकूणच नेपाळच्या संस्कृतीची भुरळ उभ्या देशाला आहे. नेपाळचे हेच सौंदर्य पाहण्यासाठी कोल्हापुरातून प्रत्येक वर्षी हजाराच्या वर पर्यटक नेपाळला जातात. मात्र, नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर नेपाळ सहलीवर जाणाऱ्या कोल्हापुरातील ५०० हून अधिक इच्छुक पर्यटकांनी त्यांचा नेपाळ दौरा रद्द केला आहे.
कोल्हापुरातून नेपाळसाठी प्रत्येक वर्षी हजारांहून अधिक पर्यटक जातात. यातील काही पर्यटक हे टुरिस्ट कंपन्यांकडून, तर काही पर्यटक स्वत:च्या वाहनाने नेपाळ गाठतात. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून नेपाळमध्ये हिंसाचार सुरू झाल्याने या पर्यटकांनी टूरिस्ट कंपन्यांना मेल पाठवून बुकिंग रद्द करण्याची विनंती केली आहे. मात्र, टूरिस्ट कंपन्यांनी विमानांचे तिकीट आधीच बुक केल्याने ते तिकीट रद्द करण्यास विमान कंपन्या तयार नाहीत. आम्ही सेवा द्यायला तयार आहे, असा पवित्रा विमान कंपन्यांनी घेतल्याने टूरिस्ट कंपन्यांचीही गोची झाली आहे.
नेपाळसाठी का मागणी
भारतातून नेपाळला जाण्यासाठी व्हिसा लागत नाही. शिवाय शेजारचा देश असल्याने तेथे जाण्यासाठी खर्चही कमी येतो. त्यामुळे नेपाळला मोठ्या प्रमाणात कोल्हापुरातील पर्यटक जातात. गणेशोत्सव संपल्याने अनेकांनी नेपाळसाठीचे नियोजन केले होते. मात्र, अचानक तेथे हिंसाचाराची परस्थिती उद्भवल्याने पर्यटकांनी नेपाळचा प्लॅन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात एक हजारांपेक्षा जास्त पर्यटक दरवर्षी नेपाळला जातात. नेपाळमध्ये हिंसाचाराची परस्थिती तयार झाल्याने जिल्ह्यातील ५०० पर्यटकांनी त्यांचा दौरा रद्द केला आहे. - बळीराम वराडे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन