नऊ धरणांत ५५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, ‘दूधगंगा’ ३८ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 13:16 IST2019-07-15T13:13:15+5:302019-07-15T13:16:15+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील ‘घटप्रभा’, ‘जांबरे’ व ‘कोदे’ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, नऊ धरणांत ५५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. चिकोत्रा ४७ टक्के, तर दूधगंगा अवघे ३८ टक्के भरले आहे. रविवारी सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घसरण होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसांत अडीच फुटांनी कमी झाली आहे. अद्याप १९ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घसरण झाली. पंचगंगा नदीघाटावरील मार्ग दुपारी मोकळा झाला. (छाया- नसीर अत्तार)
कोल्हापूर : जिल्ह्यातील ‘घटप्रभा’, ‘जांबरे’ व ‘कोदे’ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, नऊ धरणांत ५५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. चिकोत्रा ४७ टक्के, तर दूधगंगा अवघे ३८ टक्के भरले आहे. रविवारी सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घसरण होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसांत अडीच फुटांनी कमी झाली आहे. अद्याप १९ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत आहे.
रविवारी सकाळी जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी दहानंतर त्याने उघडीप दिली. पूर्वेकडे काही काळ सूर्यनारायणाने दर्शनही दिले; पण गगनबावडा, शाहूवाडी, आजरा, चंदगड तालुक्यांत पाऊस कायम राहिला. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १११.९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ४७ मिलिमीटर झाला. शाहूवाडीत २२.६७, तर शिरोळमध्ये आकडेवारी निरंक राहिली. धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. राधानगरी धरण ६६ टक्के भरले असून, त्यातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १२०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावतीच्या पाण्याची फुग कायम राहिली आहे. त्याशिवाय घटप्रभा, जांबरे व कोदे धरणांतून विसर्ग सुरूच आहे.
नद्यांच्या पातळीत घसरण होत असून, पंचगंगा सायंकाळी सहा वाजता ३१.४ फुटांवर होती. जिल्ह्यातील १९ बंधारे अद्याप पाण्याखाली असून, एका सार्वजनिक, तर सात खासगी मालमत्तांची पडझड होऊन तीन लाख ६५ हजारांचे नुकसान झाले आहे. पंचगंगेचे पाणी कमी झाल्याने नदीघाटावरील मार्ग मोकळा झाला आहे.