सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराबाबत कोल्हापुरात मनसेचे आंदोलन, १५ फुटी महाभस्मासुराच्या दहनाचा प्रयत्न
By संदीप आडनाईक | Updated: August 22, 2023 18:33 IST2023-08-22T18:32:24+5:302023-08-22T18:33:20+5:30
४६ पानांचे निवेदन आणि १०० भ्रष्टाचाराचे लेखी पुरावे देण्यात आले

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराबाबत कोल्हापुरात मनसेचे आंदोलन, १५ फुटी महाभस्मासुराच्या दहनाचा प्रयत्न
कोल्हापूर : रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता, उपअभियंत्यांना काळ्या यादीत टाका, रस्ता घोटाळ्याचे भ्रष्ट सूत्रधार बडतर्फ करून त्यांच्यावर चार दिवसांत फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी बांधकाम विभागाच्या आवारात निदर्शने केली. पितळी गणपती परिसरात आंदोलन करण्यात येणार असल्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला. जमावबंदीमुळे १५ फुटी महाभस्मासुराचे दहन करण्यास परवानगी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत वादावादी झाली.
रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल आणि भ्रष्ट कारभाराबद्दल मनसेने हे आंदोलन केले. कोल्हापुरात गेल्या दहा वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांसाठी दोनशे कोटी रुपये खर्च केले; परंतु रस्ते खराबच राहिले. महापुराच्या काळात खराब रस्त्यांसाठी केंद्राकडून पाच आणि राज्य सरकारकडून पाच कोटीचा निधी मिळाला; परंतु क्राँकिटीकरण करण्याऐवजी डांबरीकरण करून ठेकेदाराशी संगनमत करून पैसे लाटल्याचा आरोप मनसेचे शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी केला. ४६ पानांचे निवेदन आणि १०० भ्रष्टाचाराचे लेखी पुरावे देण्यात आले.
अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांच्या स्वीय सहायकांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात प्रसाद पाटील, नितेश आजगेकर, उत्तम वंदुरे, अरविंद कांबळे, सागर साळोखे, यतीन हुरणे, संजय पाटील, अजिंक्य शिंदे, अभिजित राउत, पूनम पाटील, अमित बंगे आदी सहभागी झाले.