Kolhapur: गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीत ‘जनता दल-जनसुराज्य’ येणार एकत्र, नव्या राजकीय समीकरणांची नांदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:59 IST2025-10-11T15:58:21+5:302025-10-11T15:59:32+5:30
‘पंगा’ घेणार की ‘दोस्ताना’ जपणार ?

Kolhapur: गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीत ‘जनता दल-जनसुराज्य’ येणार एकत्र, नव्या राजकीय समीकरणांची नांदी
राम मगदूम
गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हयाचे जेष्ठ नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना गडहिंग्लज नगरपालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वपक्षीय आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी जनता दल आणि जनसुराज्य पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. याकामी खुद्द आमदार विनय कोरे यांनीच पुढाकार घेतल्याची कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा आहे. तसे झाल्यास 'गडहिंग्लज'सह जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
दोन दशकांपूर्वी तत्कालीन मंत्री बाबासाहेब कुपेकर यांना गडहिंग्लज कारखाना आणि गडहिंग्लज नगरपालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यात कोरे-सावकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे कारखान्यात १५ वर्षे तर नगरपालिकेत १० वर्षे जनता दल-जनसुराज्य आघाडीची सत्ता होती. नैसर्गिक आघाडीचा हाच धागा पकडून कोरेंनी मुश्रीफ विरोधी आघाडीची मोट बांधायला सुरूवात केली आहे.
गेल्यावेळी जनसुराज्यने गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत भागही घेतला नव्हता. मात्र, जनता दलाने पहिल्यांदाच स्वबळावर नगराध्यक्षपदासह ११ जागा जिंकून सत्ता अबाधित राखली होती. विरोधी राष्ट्रवादीला ४, भाजपाला २ व शिवसेनेला १ जागा मिळाली होती.निवडणुकीनंतर भाजपा-शिवसेनेने जनता दलाशी आघाडी केली होती. दरम्यान, राज्यात केवळ 'गडहिंग्लज'मध्येच अस्तित्व आणि प्रभाव असलेल्या जनता दलाने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भक्कम पाठबळ दिले होते.
कोरेंच्या गळाला कोण -कोण लागणार?
मुश्रीफ यांच्या विरोधात 'जनता दल- जनसुराज्य'सह भाजपा, दोन्ही 'सेना', मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आदी सगळ्याच पक्षांना एकत्र आणण्याचा कोरेंचा प्रयत्न दिसतो.त्यामुळे त्यांच्या गळाला कोण-कोण लागणार ? याची उत्सुकता गडहिंग्लजसह जिल्ह्याला लागली आहे.
पालकमंत्री आबीटकर मंगळवारी 'गडहिंग्लज'मध्ये !
मंगळवारी (१४) श्रीपतराव शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्यानिमित्ताने शिंदेसेनेचे जिल्ह्याचे नेते,राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर हे पहिल्यांदाच 'गडहिंग्लज'मध्ये येत आहेत. त्यांच्या विरोधात लढलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार के . पी. पाटील यांना मुश्रीफ यांनी पुन्हा राष्ट्रवादीत घेतल्यामुळे तेदेखील गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘जद’ला बळ देणार का ? याकडेही जिल्ह्याचे लक्ष आहे.
‘पंगा’ घेणार की ‘दोस्ताना’ जपणार ?
राष्ट्रवादीची सत्ता नसतानाही मुश्रीफ यांनी सुमारे १५० कोटींचा निधी आणून गडहिंग्लज शहराच्या विकासाला गती दिली आहे. त्याच जोरावर महायुतीच्या माध्यमातून नगरपालिकेवर 'राष्ट्रवादी'चा झेंडा फडकविण्याची घोषणा त्यांनी वेळोवेळी केली आहे. नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागातील आरक्षणे अनुकूल असल्यामुळे राष्ट्रवादीत खुशीचे वातावरण असताना सावकरांचे पुनरागमन झाले आहे. परंतु, ते मुश्रीफांशी राजकीय ‘पंगा’ घेणार की सतेज पाटील यांच्याप्रमाणे ‘दोस्ताना’ जपणार ? यासाठी वाट पहावी लागणार आहे.