Cabinet expansion: मुश्रीफ, आबीटकर यांना निष्ठेचे फळ; क्षीरसागर, कोरे यांच्या पदरी निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:00 IST2024-12-16T12:59:27+5:302024-12-16T13:00:10+5:30
भाजपची मदार चंद्रकांत पाटील यांच्यावरच : महामंडळावर होणार काही जणांची बोळवण

Cabinet expansion: मुश्रीफ, आबीटकर यांना निष्ठेचे फळ; क्षीरसागर, कोरे यांच्या पदरी निराशा
कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अखेर रविवारी पार पडला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार हसन मुश्रीफ व तरुण आमदार प्रकाश आबीटकर यांना संधी मिळाली आहे. चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून निवडून आले असले, तरी ते मूळचे कोल्हापूरचे असल्याने त्यांच्या निमित्ताने कोल्हापूर तिसरे मंत्रिपद मिळाले. पाटील, मुश्रीफ व आबीटकर यांना त्यांच्या पक्षांनी निष्ठेचे फळ दिले असले, तरी मंत्रिपदासाठी निकराचे प्रयत्न करणारे राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे व चंद्रदीप नरके यांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात दहा पैकी दहा जागा जिंकत महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ केला. त्यामुळे मंत्री पदासाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, निकाल लागल्यापासून एक-दोन आमदार वगळता सर्वांनीच मंत्रिपदासाठी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली होती. जनसुराज्य पक्षाचे नेते विनय काेरे हे भाजपसोबत राहिले, त्यात त्यांच्यासह दोन आमदार असल्याने ते पहिल्यापासूनच मंत्री पदाचे दावेदार होते. कॅबिनेट मंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती, पण त्यांना संधी मिळाली नाही.
हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित होते. शिंदेसेनेमध्ये मंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळाली. राजेश क्षीरसागर, प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी निकराचे प्रयत्न केले. यामध्ये आबीटकर यांनी मुसंडी मारली.
विद्यमान मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा राहील, असे पक्ष श्रेष्ठींनी सांगितल्याने इच्छुकांना अडीच वर्षे थांबावे लागणार आहे, तर काहींची महामंडळावर बोळवण होण्याची शक्यता आहे.
शिंदे यांनी शब्द खरा केला
गारगोटी येथील भुदरगड तहसीलदार कार्यालय भूमी पूजनासह विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तुम्ही प्रकाश आबीटकर यांना पुन्हा निवडून द्या, मंत्रिपदाचा बॅकलाॅग भरून काढला जाईल, अशी ग्वाही दिली होती. शिंदे यांनी तो शब्द खरा केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
क्षीरसागर यांची कोंडी..
विधानसभा निवडणुकीत माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्याचा शब्द माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. निवडणुकीनंतर आपणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते, म्हणून ते देण्यास राजेश क्षीरसागर ही तयार झाले. पण, आता त्यांची कोंडी झाली आहे.
‘राधानगरी’ला पहिल्यांदाच संधी, भुदरगडला दोन मंत्री
‘राधानगरी’ मतदारसंघाला आतापर्यंत मंत्रिपदाची कधीच संधी मिळाली नव्हती. प्रकाश आबीटकर यांच्या रूपाने पहिल्यांदा संधी मिळाल्याने मतदारसंघात कमालीचा उत्साह पहावयास मिळतो. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील व आबीटकर यांच्या रूपाने भुदरगड तालुक्याला दोन मंत्री मिळाले आहेत.
मुश्रीफ नवव्यांदा झाले मंत्री
हसन मुश्रीफ हे ‘कागल’मधून सहाव्यांदा निवडून आले, तर मंत्रिपदाची त्यांनी सहाव्यांदा शपथ घेतली. पंचायत समिती सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. काेल्हापूर जिल्हा बँकेचे ते गेली नऊ वर्षे अध्यक्ष आहेत.