मिशन लोकसभा: आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 14:56 IST2024-01-21T14:55:31+5:302024-01-21T14:56:08+5:30
सहा राज्यांच्या स्क्रिनिंग समितीवर निवड

मिशन लोकसभा: आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून मोठी जबाबदारी
कडेगाव: अखिल भारतीय काँग्रेस समितीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटक,तेलंगणा, तामिळनाडू, केरळ,लक्षद्वीप,पुडुचेरी या सहा राज्यांच्या स्क्रीनिंग कमिटी सदस्यपदी आमदार डॉ.विश्वजित कदम यांची निवड केली आहे. या समितीच्या माध्यमातून सबंधित राज्यात आता लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची निश्चिती करण्यात येणार आहेत.पक्षातील ही मोठी जबाबदारी असणारी समिती आहे.
आगामी २०२४ च्या लोकसभेच्या निवडुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्व राज्यांसाठी नुकतीच स्क्रीनिंग समिती निवडण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी,खासदार राहुल गांधी,काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेसह पक्ष नेतृत्वाकडून आमदार डॉ.विश्वजित कदम यांची सहा राज्यांच्या समितीवर नियुक्ती केली.या निमित्ताने पक्ष नेतृत्वाने आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कर्नाटक व तामिळनाडूच्या बैठकीला उपस्थिती:
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी कर्नाटक राज्यातील स्क्रिनिंग समितीची बैठक बेंगलोर येथे नुकतीच संपन्न झाली. याशिवाय तामिळनाडू राज्याच्या समितीची बैठक चेन्नई येथे झाली. या दोन्ही बैठकींना आमदार डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.