कुरुंदवाड : अतिक्रमणे नियमितीकरणाबाबत खोटी माहिती देऊन नगराध्यक्ष जयराम पाटील शहरातील जनतेची दिशाभूल करीत आहेत. तुमच्या हातून नियमितीकरणाचे काम होत असेल तर तुमचे स्वागतच करू. मात्र, खोटी माहिती देऊन नागरिकांची फसवणूक केली, तर अतिक्रमणधारकांना घेऊन नगराध्यक्ष पाटील यांच्या घरासमोर ठिय्या मांडून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष व पालिकेतील विरोधी आघाडीचे नेते रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
अतिक्रमण जागेच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अद्याप पैसे भरले नाहीत. त्यामुळे अतिक्रमण जागेची मोजणी झाली नसताना प्रांताधिकारी यांच्या बैठकीचा फार्स कशासाठी, त्रिसदस्यीय समितीचे सचिव मुख्याधिकारी असताना नगराध्यक्ष यांच्या नावे पत्र काढले जाते. प्रांताधिकारी यांनी अतिक्रमण नियमितीकरणाबाबत बैठकीची तारीख व वेळ दिली नसताना खोट्या प्रसिद्धीचा हव्यास कशासाठी याचे नगराध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांना गेल्या साडेचार वर्षांत विकासकामे करता आली नाहीत. चुकीची माहिती प्रसिद्धीला देऊन जनतेला वेड्यात काढण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांबद्दल शहरात असंतोष पसरला असल्याचे डांगे यांनी म्हटले आहे.