मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात; रत्नागिरी रोडवर राजपूतवाडी नजिक अपघात
By उद्धव गोडसे | Updated: December 24, 2023 17:15 IST2023-12-24T17:13:40+5:302023-12-24T17:15:34+5:30
अपघातात मंत्री सावंत सुखरूप, स्वीय सहायक रवीराज जाधव किरकोळ जखमी, रत्नागिरी रोडवर राजपूतवाडी नजिक अपघात.

मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात; रत्नागिरी रोडवर राजपूतवाडी नजिक अपघात
Tanaji Sawant Accident ( Marathi News ) : विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला रविवारी (दि. २४) दुपारी कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर रजपूतवाडी नजिक अपघात झाला. या अपघातात मंत्री सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांचे स्वीय सहायक रावीराज जाधव हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर मंत्री सावंत दुसऱ्या शासकीय वाहनाने जोतिबा डोंगर येथे दर्शनासाठी रवाना झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंत्री सावंत हे रविवारी सकाळी गारगोटी येथील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम उरकून त्यांनी कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर ते जोतिबा देवाच्या दर्शनाला जात असताना कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर रजपूतवाडी नजीक क्यानवायमध्ये पाठीमागील वाहनाने मंत्री सावंत यांच्या वाहनास धडक दिली.
या अपघातात मंत्री तानाजी सावंत सुखरूप असून, स्वीय सहायक रविराज जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत. सावंत यांच्या ताफ्यातील वैद्यकीय पथकाने तातडीने जाधव यांच्यावर उपचार केले. गाडीचेही नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर मंत्री सावंत हे दुसऱ्या शासकीय वाहनाने तातडीने जोतिबाच्या रवाना झाले. दर्शन घेऊन ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी गेल्याचे पोलिसांनी सांगितले.