मंत्री आबिटकर यांचा आदेश खत कंपन्यांकडून बेदखल; ‘युरिया’सोबत ‘मायक्रोला’चे लिंकिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:18 IST2025-01-09T12:17:48+5:302025-01-09T12:18:18+5:30

कंपन्या मंत्र्यांचे ऐकेनात, मग दाद कोणाकडे मागायची?

Minister Prakash Abitkar orders eviction from fertilizer companies Linking of Microla with Urea | मंत्री आबिटकर यांचा आदेश खत कंपन्यांकडून बेदखल; ‘युरिया’सोबत ‘मायक्रोला’चे लिंकिंग 

मंत्री आबिटकर यांचा आदेश खत कंपन्यांकडून बेदखल; ‘युरिया’सोबत ‘मायक्रोला’चे लिंकिंग 

कोल्हापूर : आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर यांनी दोन दिवसांपूर्वी कृषी विभाग, खत विक्रेते आणि कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लिंकिंग न करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोनच दिवसांत खत कंपन्यांनी ‘युरिया’सोबत ‘मायक्रोला’ हे लिंकिंग विक्रेत्यांकडे पाठवले आहेत. मंत्र्यांच्या सूचनेलाही खत कंपन्या जुमानत नसल्याने शेतकऱ्यांनी आता दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न विचारला जात आहे.

महागड्या खतांमुळे अगोदरच शेतकरी त्रस्त आहेत. त्यात युरियावर लिंकिंग दिले जाते. युरिया २६५ रुपये, तर लिंकिंग दीडशे-दोनशे रुपये घ्यावे लागते. अगोदरच युरियाचा दर स्थिर ठेवला; पण वजन दहा किलोंनी कमी करून खत कंपन्यांनी मखलाशी केली आहे. लिंकिंगने शेतकरी त्रस्त झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर यांनी कृषी विभाग, खत विक्रेते व खत कंपन्यांची बैठक घेऊन लिंकिंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मंत्री आबिटकर यांनी बैठक घेऊन दोन दिवस झाले तोपर्यंत कंपन्यांनी युरियावर ‘मायक्रोला’ बॉक्स विक्रेत्यांकडे पाठवून दिले आहेत. यावरून खत कंपन्यांची मग्रुरी किती वाढली आहे, हे लक्षात येते.

विक्रेत्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

लिंकिंगमुळे शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये वाद होऊ लागले आहेत. कृषी विभागही विक्रेत्यांवरच कारवाई करत आहे; पण मूळ दोषी असणाऱ्या कंपन्यांवर शासन थेट कारवाई का करत नाही? या सगळ्यात तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था विक्रेत्यांची झाली आहे.

Web Title: Minister Prakash Abitkar orders eviction from fertilizer companies Linking of Microla with Urea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.