Kolhapur Politics: मुश्रीफ म्हणाले...सोबत राहा, कोरे म्हणाले...लोकभावना पहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:02 IST2025-10-28T17:02:05+5:302025-10-28T17:02:29+5:30
‘जनसुराज्य’चे समर्थक बुचकळ्यात

Kolhapur Politics: मुश्रीफ म्हणाले...सोबत राहा, कोरे म्हणाले...लोकभावना पहा
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या समर्थकांनी पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे-सावकर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. मुश्रीफांची ‘विनंती’ आणि सावकरांच्या सल्ल्यामुळे ते बुचकळ्यात पडले असून, त्यांच्या ‘भूमिके’कडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी जनता दलाच्या नेत्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी सहकाऱ्यांसह आमदार कोरे यांची भेट घेतली. त्यामुळे ‘जनता दल-जनसुराज्य’ पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनीही कोरे यांची भेट घेऊन महायुतीचे घटक म्हणून राष्ट्रवादीला मदत करण्याची विनंती केली. त्या पाठोपाठ ‘जनसुराज्य’चे माजी नगरसेवक व समर्थकांनीही मुश्रीफ-कोरेंची भेट घेतली. त्यामुळे ‘गाठी-भेटी’च्या सत्राची शहरात जोरदार चर्चा आहे.
मंत्री मुश्रीफ यांची कागलच्या शासकीय विश्रामगृहात भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनीही घटक पक्ष म्हणून ‘जनसुराज्य’च्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत रहावे, अशी विनंती केली. मात्र, सावकर व आपण दोघांनी निर्णय घ्यावा, आम्ही आपल्या निर्णयासोबत आहोत, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार कोरे यांची वारणानगरमध्ये भेट घेतली. सविस्तर चर्चेत त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याबरोबरच शहरातील विविध स्तरातून मिळालेला ‘फिडबॅक’ही सांगितला. यापूर्वीच्या निवडणुकांचा कौल आणि आता ‘लोक काय म्हणतात पाहून निर्णय घ्या’, असा सल्ला दिला.
यावेळी ‘जनसुराज्य’चे माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, माजी नगरसेवक बाळासाहेब गुरव व चंद्रकांत सावंत, ज्येष्ठ पंच आप्पासाहेब बस्ताडे, अरुण बेल्लद, विठ्ठल भमानगोळ, अजित विटेकरी, रावसाहेब कुरबेट्टी, जवाहर घुगरी, आनंद पेडणेकर, संदीप कुरळे उपस्थित होते.