प्रभू रामचंद्र ने मुझे बुलाया है !, वाढदिवसा निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले रामल्ललांचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:01 IST2025-03-25T16:00:38+5:302025-03-25T16:01:00+5:30
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा सोमवारी (दि. २४) वाढदिवस, या निमित्ताने त्यांनी अयोध्येत जाऊन रामल्ललांचे दर्शन घेतले. ...

प्रभू रामचंद्र ने मुझे बुलाया है !, वाढदिवसा निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले रामल्ललांचे दर्शन
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा सोमवारी (दि. २४) वाढदिवस, या निमित्ताने त्यांनी अयोध्येत जाऊन रामल्ललांचे दर्शन घेतले. मंत्री मुश्रीफ हे तिथीनुसारच रामनवमीलाच वाढदिवस साजरा करतात. तसेच त्यांनी ५- मराठा बटालियनच्या वर्धापन दिन कार्यक्रमालाही उपस्थिती लावली. कागल तालुक्यातील साके येथील रहिवासी असलेले व ऑनररी लेफ्टनंट पदावर काम करीत असलेल्या संतोष चौगुले यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
अयोध्या नगरीत ५- मराठा बटालियन इन्फंट्रीचे युनिट तैनात आहे. सोमवारी बटालियनचा २२५वा वर्धापन दिन होता, या वर्धापन दिनाला उपस्थिती रहावे म्हणून संतोष चौगुले यांनी मंत्री मुश्रीफ यांना आग्रह केला होता. यावेळी कर्नल जगदाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा भेट देऊन मंत्री मुश्रीफ यांचा बटालियनच्या वतीने सत्कार केला. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, बाळासाहेब तुरंबे उपस्थित होते.
कृतज्ञता सैनिकांची..!
मुश्रीफ ग्रामविकासमंत्री म्हणून कार्यरत असताना आजी-माजी सैनिकांसाठी केलेली मालमत्ता कराची सूट तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केलेली मदत आणि शहीद जवानांची स्मारके व स्मृती कमानी याबद्दल सैनिकांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.
प्रभू रामचंद्र ने मुझे बुलाया है..!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रभू श्री. रामचंद्रांनी मला अयोध्येला बोलावल्याशिवाय असा योगायोग घडून येणे शक्यच नाही. माझा तारखेनुसार येणारा २४ मार्च हा वाढदिवस, ५ - मराठा बटालियन इन्फंट्रीचा वर्धापन दिन आणि प्रभू श्री. रामचंद्रांची राजधानी अयोध्यानगरी हा सर्वच एक मोठा योगायोग आहे. त्यामुळेच ‘प्रभू श्री रामचंद्राने मुझे बुलाया है...’ या भावनेतून मी अयोध्येत पोहोचलो.