Kolhapur Municipal Election 2026: नसेल मुश्रीफ-सतेज जोडी...तर कुणाची होणार कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:27 IST2025-12-16T14:26:31+5:302025-12-16T14:27:05+5:30
पहिला कुस्ती नंतर दोस्ती

Kolhapur Municipal Election 2026: नसेल मुश्रीफ-सतेज जोडी...तर कुणाची होणार कोंडी
कोल्हापूर : जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समिती या सहकारी संस्थांसह जिल्हा परिषद व महानगरपालिकेत एकत्र मार्गक्रमण करणारे मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच सवता सुभा मांडणार आहेत. गत २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता होती. तरीही काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी महानगरपालिकेवर आघाडीचा झेंडा फडकावला होता.
मात्र, गेल्या दहा वर्षात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याने त्याचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावरही पडले आहेत. गत महापालिकेत एकसंघ असलेली काँग्रेस- राष्ट्रवादी या निवडणुकीत थेट आमनेसामने येणार आहे.
वाचा: निवडणूक जाहीर होताच दोन्ही आघाड्यांकडून मोर्चेबांधणीला वेग, प्रशासनाचीही लगबग
इंडिया आघाडीत चर्चेच्या फेऱ्या
महानगरपालिकेची निवडणूक इंडिया आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. इंडिया आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष असल्याने त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धवसेना व इतर डाव्या पक्षांसोबत जागांबाबत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. येत्या तीन दिवसांत चर्चेच्या फेऱ्या संपून अंतिम जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीची धुरा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, खासदार शाहू छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्यावर आहे.
पहिला कुस्ती नंतर दोस्ती
गतनिवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरली होती. यात काँग्रेसने ३० तर राष्ट्रवादीने १५ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला सोबत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेत सत्ता स्थापन केली होती.
महायुतीचा निर्णय कधी ?
महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्यासाठी वरिष्ठ नेते आग्रही असल्याने स्थानिक पातळीवर तशा पद्धतीने निर्णय होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू झाल्या असून महायुतीकडून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यावर महायुतीची धुरा असेल.
२०१५ मध्ये महापालिका निवडणूक पक्षीय बलाबल
- काँग्रेस- ३०
- राष्ट्रवादी- १५
- शिवसेना- ०४
- ताराराणी आघाडी-१९
- भाजप- १३
- एकूण जागा -८१