चर्चेला अमराठा नेता का पाठवता?; चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, कोल्हापुरातील मराठा समाजाची मागणी
By संदीप आडनाईक | Updated: October 30, 2023 14:40 IST2023-10-30T14:39:33+5:302023-10-30T14:40:56+5:30
तत्काळ विशेष अधिवेशन बोलवा, लोकप्रतिनिधींचे सार्वजनिक कार्यक्रम उधळू

चर्चेला अमराठा नेता का पाठवता?; चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, कोल्हापुरातील मराठा समाजाची मागणी
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या राज्यस्तरीय उपसमितीचे अध्यक्षपद मराठा मंत्र्याकडे असताना त्यांच्याऐवजी अमराठा नेता चर्चेला पाठविला जातो, याचा निषेध करुन या उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी द्यावा अशी मागणी कोल्हापुरातील मराठा समाजाच्या समन्वयकांनी केली. तसेच विधानसभेचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम करु नयेत, केल्यास ते उधळून लावण्याचा इशारा दिला.
कोल्हापूरात ऐतिहासिक दसरा चौकात आज, सोमवारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही साखळी उपोषण केले. यावेळी तातडीने घेतलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंदूलकर, दिलिप देसाई, बाबा पार्टे, संपत पाटील, शाहीर दिलिप सावंत, शशिकांत पाटील, अनिल घाटगे, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.
समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती या मराठा नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही राज्यकर्ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी मराठा मंत्री असताना अमराठा नेत्यांना चर्चेसाठी पाठविले जाते त्याचा निषेध करुन या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा आणि सर्व विषय बाजूला ठेवून दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा असा निर्णय घेण्यात आला.