..तर उद्धव ठाकरेंवर अशी वेळ आली नसती, मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला

By संताजी मिठारी | Published: August 30, 2022 06:12 PM2022-08-30T18:12:47+5:302022-08-30T18:13:36+5:30

त्यामुळे आमच्या लोकसभा प्रवासावर त्यांनी हरकत घेण्याची गरज नाही

Minister Chandrakant Patil criticizes Shiv Sena party chief Uddhav Thackeray | ..तर उद्धव ठाकरेंवर अशी वेळ आली नसती, मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला

..तर उद्धव ठाकरेंवर अशी वेळ आली नसती, मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला

Next

कोल्हापूर : प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आहे. उद्धव ठाकरेंही तेच प्रयत्न करत आहेत. त्यांनी हे जर यापूर्वी केले असते, तर बहुधा त्यांच्यावर अशी वेळ आली नसती, असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला. आज, मंगळवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ठाणे, मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. त्यातून मुख्यमंत्री शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न आहे का? अशी विचारणा मंत्री पाटील यांना केली असता ते म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आहे. त्यानुसार त्यांनी केले असेल. त्यामुळे आमच्या लोकसभा प्रवासावर त्यांनी हरकत घेण्याची गरज नाही. असा प्रवास आणि लक्ष केंद्रीत जर, उद्धव ठाकरे यांनी केले असते, तर बहुधा त्यांच्यावर अशी वेळ आली नसती.

लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे ध्येय

सन २०२४ मध्ये लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे ध्येय भाजपचे आहे. ३०३ जागा कायम राखत आणखी १०० जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ मतदारसंघासाठी १६ केंद्रीय मंत्री ठरले असून त्यांनी तीन दिवसांचा प्रवास करायचा आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या बारामतीमध्ये जाणार आहेत. त्यांची पूर्वतयारी करण्यासाठी बावनकुळे जातील.

..त्याचा फायदा शिंदे गटातील खासदारांना

१६ पैकी १२ खासदार हे शिवसेनेचे होते. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे झाले आहेत. त्याठिकाणी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचा त्यांना फायदा होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. एखादी जबाबदारी आल्यानंतर आपण समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटतो. त्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची नवी जबाबदारी आल्याने ते सर्वांना भेटत आहेत. त्याअंतर्गत राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Minister Chandrakant Patil criticizes Shiv Sena party chief Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.