एमआयएम’ कार्यकर्त्यास महापालिकेत बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:18 IST2020-01-10T19:14:01+5:302020-01-10T19:18:05+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांना गेल्या महिन्याभरापासून दमबाजी तसेच शिवीगाळ करण्याचा प्रकार ‘एमआयएम’चा कार्यकर्ता शाहीद शाहजहॉँन शेख याच्या चांगलाच अंगलट आला.

एमआयएम’ कार्यकर्त्यास महापालिकेत बेदम मारहाण
कोल्हापूर : महानगरपालिकेचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांना गेल्या महिन्याभरापासून दमबाजी तसेच शिवीगाळ करण्याचा प्रकार ‘एमआयएम’चा कार्यकर्ता शाहीद शाहजहॉँन शेख याच्या चांगलाच अंगलट आला.
गुरुवारी (दि. ९) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अश्लील भाषेत शिवीगाळ करून घाटगे यांना महापालिकेत येण्याचे आव्हान देताच संतप्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जमावाने त्याला महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतच अक्षरश: रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे महापालिकेत एकच खळबळ माजली.
‘एमआयएम’चा कार्यकर्ता शाहीद शाहजहॉँन शेख हा गेल्या महिन्याभरापासून सुजित माने (रा. सदर बाजार) या व्यक्तीस पंडित जवाहरलाल नेहरू घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करीत होता; परंतु माने यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही, असा उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांचा दावा होता.
या संदर्भात न्यायालयातील निकालही महापालिकेच्या बाजूने लागला आहे. तरीही शेख याने गेल्या महिन्याभरापासून घाटगे यांच्याकडे घरकुल द्यावे म्हणून तगादा लावला होता. गेल्या आठवड्यात त्याने घाटगे यांना निवेदन देऊन पुढील आठ दिवसांत या प्रकरणाचा निपटारा करावा, अशी मागणी केली होती.