शहरातील सुतारवाडा येथील नऊ कुटुंबांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:43 IST2019-08-02T00:41:33+5:302019-08-02T00:43:27+5:30
नदीचे पाणी जामदार क्लबपर्यंत आले होते. गुरुवारी सकाळी सुतारवाड्यात पाणी पोहोचले. त्यामुळे तेथील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता गृहीत

कोल्हापुरातील दसरा चौकाजवळील सुतारवाडा परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे तेथील कुटुंबांचे नजीकच्या चित्रदुर्ग मठात स्थलांतर केले असून, या कुटुंबांनी तिथे आपला तात्पुरता संसार मांडला आहे.
कोल्हापूर : शहर आणि परिसरातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेची यंत्रणाही सज्ज झाली असून, पुराचे पाणी आलेल्या दसरा चौक येथील सुतारवाडा वसाहतीत राहणाऱ्या नऊ कुटुंबांचे गुरुवारी सकाळी चित्रदुर्ग मठ व मुस्लिम बोर्डिंग येथे स्थलांतर करण्यात आले.
शहरात गुरुवारी पावसाने बरीच उघडीप दिली. मात्र, राधानगरी धरणाचे चार दरवाजे अद्यापही उघडलेले असल्याने नदीची पाणीपातळी वाढत आहे. नदीचे पाणी जामदार क्लबपर्यंत आले होते. गुरुवारी सकाळी सुतारवाड्यात पाणी पोहोचले. त्यामुळे तेथील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
शहरात काही ठिकाणी सखल भागात पुराचे पाणी आले असल्याने गुरुवारी शहरातील पूर परिस्थितीची पाहणी महापौर माधवी गवंडी, उपमहापौर भूपाल शेटे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत केली. यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, अशा सूचना महापौर गवंडी यांनी दिल्या.स्थलांतरित नागरिकांसाठी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी लाईट, पाण्याची व्यवस्था नीटनेटकी करावी, आरोग्य पथके
कार्यरत ठेवावीत, औषध फवारणी करावी, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या. चित्रदुर्ग मठ येथे चार कुटुंबे व मुस्लिम बोर्डिंग येथे पाच कुटुंबे स्थंलातरित करण्यात आली आहेत. या कुटुंबाचीही महापौरांनी चौकशी केली. यावेळी सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, राहुल चव्हाण, लाला भोसले, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता आर. के. जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, मिलिंद जाधव उपस्थित होते.
पूरस्थितीचा सामना करण्यास महापालिकेची यंत्रणा सज्ज असून, ज्या भागात पाणी आले आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतर करण्यात येत आहे. सर्व अधिकाºयांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांनी स्थलांतर होण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त कलशेट्टी यांनी केले.
भिंती कोसळण्याचे प्रकार
गुरुवारी शहरात मार्केट यार्ड व रंकाळा बसस्थानक परिसरात घराच्या भिंती कोसळण्याचे प्रकार घडले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मार्केट यार्डात भिंत कोसळण्याची शक्यता असल्याची वर्दी अग्निशमन दलास मिळाली. तेव्हा बांधकाम विभागाच्या कर्मचाºयांनी तातडीने जाऊन ती भिंत उतरवून घेतली. दाभोळकर कॉर्नर, विश्वपंढरी परिसरात झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या.
या फोनवर संपर्क साधावा
आपत्कालीन स्थितीच्या मुकाबल्यासाठी महापालिकेच्या इमारतीमधील अग्निशमन विभागाकडे मुख्य आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १०१ असा आहे. तसेच आरोग्य विभागाच्या आपत्तीकाळातील तक्रारींसंदर्भात दूरध्वनी क्रमांक २५४०२९० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत चार विभागीय कार्यालयांमध्ये दक्षता पथके चोवीस तास कार्यरत ठेवण्यात आलेली आहेत.