व्यापारी खून प्रकरण : इचलकरंजीत ४८ तास व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 16:11 IST2019-01-18T16:09:03+5:302019-01-18T16:11:01+5:30
इचलकरंजी येथील व्यापारी तरुणाच्या खून प्रकरणाचा निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ४८ तास आपला व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय महेश सेवा समितीमध्ये झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

इचलकरंजी येथील व्यापारी खून प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आयोजित बैठकीत अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी तपासाबाबत माहिती दिली. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, सतीश डाळ्या, तानाजी पोवार, भीमकरण छापरवाल, नितीन धूत, सुनील महाजन, आदी उपस्थित होते. (छाया-उत्तम पाटील)
इचलकरंजी : येथील व्यापारी तरुणाच्या खून प्रकरणाचा निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ४८ तास आपला व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय महेश सेवा समितीमध्ये झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, येत्या ३६ तासांत तपास पूर्ण करून संशयितांना अटक केली जाईल. त्यासाठी विविध सहा ठिकाणी पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.
घाडगे म्हणाले, कोणत्याही कारणातून खुनासारखी घटना घडणे, ही बाब निंदनीय आहे. मात्र, अशा घटना घडूच नयेत, यासाठीही आपणाकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. अनेकवेळा व्यापारी सकाळी तक्रार सांगतात आणि सायंकाळी तक्रार नाही म्हणतात. त्याचबरोबर आपले दुकान, पेढी, घर याठिकाणी सीसीटीव्ही लावून अनेक प्रकारच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी अथवा उघडकीस येण्यासाठी आपण पोलिस प्रशासनाची मदत करू शकतो. त्याचबरोबर स्वत:च्या सुरक्षिततेसाठीही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक वेळी व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये तसे आवाहन केले आहे. त्याला व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही.
शहरातील चौदा टोळ्यांना मोक्का लावून त्या माध्यमातून १०२ संशयित आरोपींना गजाआड केले आहे. त्यातूनही जे अद्याप बाहेर आहेत, त्यांच्याबाबत तक्रार असल्यास संपर्क साधावा. त्यांचे नाव गोपनीय ठेवून पोलिस आपले कर्तव्य बजावतील. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अपप्रवृत्तीविरोधात पुढे येवून अशा घटना घडण्याआधीच रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यापारी व उद्योजकांच्या पाठीशी सरकार ठामपणाने उभे आहे. अशा घटना तसेच खंडणी, धमकी असे प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिस दलाला शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाया सुरू केल्या आहेत. व्यापाऱ्यांनी निर्भयपणे आपला व्यवसाय करावा, असे आवाहन केले.
यावेळी सचिन झंवर, लक्ष्मीकांत मर्दा, उत्तम आवाडे, घनश्याम इनानी, आदींनी मनगोत व्यक्त केले. बैठकीस भीमकरण खटोड, रामपाल भंडारी, नंदकिशोर भुतडा, ब्रिजमोहन काबरा, रामलाल मुंदडा, भीमकरण छापरवाल, सतीश डाळ्या, नितीन धूत, सुनील महाजन, आदी उपस्थित होते.