The mercenary struck four hundred thousand jewelery | मोलकरणीने मारला पावणेचार लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
मोलकरणीने मारला पावणेचार लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

ठळक मुद्देमोलकरणीने मारला पावणेचार लाखांच्या दागिन्यांवर डल्लानागाळा पार्कातील घटना : राजेंद्रनगर येथील मोलकरणीस अटक

कोल्हापूर : महापुराच्या कालावधीत गुरुकमल रेसिडेन्सी, नागाळा पार्क येथील घरी कोणी नसल्याचे पाहून साफसफाई करणाऱ्या मोलकरणीने कपाटातील पावणेचार लाख रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे शनिवारी (दि. १२) उघडकीस आले.

या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी काही तासांतच संशयित मोलकरीण वंदना सुरेश शिंदे (वय ४५, रा. राजेंद्रनगर) हिला अटक केली. तिने चोरीची कबुली दिली असून, घरात लपवून ठेवलेले काही दागिने परत केले.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी संजना निशांत श्रीवास्तव (२९, रा गुरुकमल रेसिडेन्सी, नागाळा पार्क, मूळ रा. पटणा) या कुटुंबासह राहतात. त्या आणि त्यांचे पती खासगी नोकरी करतात. एक वर्षापासून त्यांच्या घरी वंदना शिंदे ही साफसफाईचे काम करण्यासाठी येत होती. ८ आॅगस्टला महापुरामुळे परिसरात पाणी आल्याने श्रीवास्तव कुटुंबीय घराला कुलूप लावून गावी पटणा येथे राहण्यासाठी गेले.

काही दिवसांनी संजना श्रीवास्तव परत घरी आल्या. कपाट उघडून पाहतात तर त्यातील सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे दिसून आले. त्यामध्ये लक्ष्मीहार, चार चेन, अंगठ्या, पेंडल, कानातील डूल, नथ, झुमके, टॉप्स, लॉकेट, चांदीचे नाणे, पैंजण, जोडवी, मोतीमाळ, बँक लॉकरची चावी असा ऐवज होता.

घराची चावी शेजारी ठेवत होते. श्रीवास्तव कुटुंबीय घरी नसताना संशयित वंदना शिंदे घरी येत होती. तिच्यावर संशय व्यक्त करून पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी शिंदे हिला विश्वासात घेत चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. राजेंद्रनगर येथील आपल्या घरी लपवून ठेवलेले दागिने तिने परत केले. चेन, रिंग, बँक लॉकरची चावी अद्याप तिने दिलेली नाही. पोलीस तिच्याकडे चौकशी करीत आहेत.
 

 


Web Title: The mercenary struck four hundred thousand jewelery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.