Kolhapur: प्राधिकरणातील ४२ गावांचा एप्रिलपर्यंत ‘मास्टर प्लॅन’ करा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:09 IST2025-02-18T13:08:58+5:302025-02-18T13:09:20+5:30
दोषींवर कारवाई करण्याचे आदेश

Kolhapur: प्राधिकरणातील ४२ गावांचा एप्रिलपर्यंत ‘मास्टर प्लॅन’ करा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या सूचना
कोल्हापूर : प्राधिकरणाने चांगला आराखडा करून शहरालगतच्या ४२ गावांमध्ये विकास करणे आवश्यक होते; पण याकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालातील दोषींवर कारवाई करा, कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदला अशा सक्त सूचना सोमवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. यापुढील बैठकीत प्राधिकरणाने लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ४२ गावांचा मास्टर प्लॅन करून त्याचे सादरीकरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी उपस्थित होते. प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार चव्हाण यांनी सादरीकरण केले. ‘लोकमत’ने या कार्यालयातील भोंगळ कारभाराची सडेतोड वृत्तमालिका लिहून पर्दाफाश केला होता.
आमदार अमल महाडिक व चंद्रदीप नरके यांनी पुढील तीन महिन्यांत प्राधिकरण कार्यालयाच्या कामाला गती द्यावी, अशी सूचना केली. संजयकुमार चव्हाण यांनी करवीरमधील ३७ व हातकणंगलेमधील ५ अशा ४२ गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र महापालिका वगळून १८६.१३ चौरस किलोमीटर. आहे. समाविष्ट ४२ गावांत येत्या काळात दिलेल्या सूचनांनुसार सर्व बाबींचा विचार करून पुढील उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.
पुढील २०० वर्षांचा विचार करून मास्टर प्लॅन करा
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा अहवाल सादर करा, ४२ गावांतील सार्वजनिक जागांमधून उत्पन्न कसे घेता येईल याचे नियोजन करा. यापुढे दर महिन्याला प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल. अनधिकृत कामे थांबविणे, नवीन कामांना मंजुरी, संनियंत्रण यासह नव्याने विकासात्मक कामे हाती घ्या. पुढील २०० वर्षांचा विचार करून मास्टर प्लॅन करताना अनुभवी व तांत्रिकदृष्ट्या सक्षम संस्थेची मदत घ्या.
कर्मचारी भरती करा..
मंत्री आबिटकर यांनी प्राधिकरण कार्यालयाला मंजूर पदसंख्येनुसार सर्व रिक्त पदांची भरती करा. सध्या फक्त ११ जण कार्यरत असून, १६ जागा रिक्त आहेत. गरज पडल्यास कंत्राटी पदभरती करून अनुभवी व कौशल्य असलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्यास सांगितले.