Married spouse commits suicide because of ambiguity | माहेरी आलेल्या विवाहितेची रंकाळ्यात आत्महत्या, कारण अस्पष्ट

माहेरी आलेल्या विवाहितेची रंकाळ्यात आत्महत्या, कारण अस्पष्ट

ठळक मुद्देमाहेरी आलेल्या विवाहितेची रंकाळ्यात आत्महत्याकारण अस्पष्ट

कोल्हापूर : माहेरी आलेल्या विवाहितेने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. पूजा सागर गवळी (वय २५, रा. सुळकुड, ता. कागल) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांनी सांगितले, पूजा गवळी हिचे नववीपर्यंत शिक्षण झाले. आई, भाऊ यांच्यासोबत ती राहत होती. वडिलांचे छत्र हरविले आहे. घरची परिस्थिती गरिबीची आहे. सात वर्षांपूर्वी तिचे सुळकुड येथील सागर गवळी यांच्याशी लग्न झाले. त्यांना देवराज (६) आणि सुदर्शन (४) अशी दोन मुलगे आहेत.

चार दिवसांपूर्वी ती माहेरी सुभाषनगरला आईकडे मुलांसह राहण्यासाठी आली होती. तिचा पती सागर हा कागल औद्योगिक वसाहतीमध्ये एका कारखान्यात नोकरी करतो. मंगळवारी (दि. १७) ती मैत्रिणीकडे जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडली. सायंकाळी चार वाजता डी. मार्टच्या समोर रंकाळा तलावात तिने उडी घेतली. फिरायला आलेल्या लोकांच्या समोर हा प्रकार घडल्याने त्यांनी आरडाओरड केली. तिला वाचविण्यासाठी कोणीच पुढे न गेल्याने बुडून तिचा मृत्यू झाला.

अग्निशामक दलाच्या जवानांना वर्दी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यातून मृतदेह बाहेर काढून ‘सीपीआर’च्या शवागृहात ठेवला. तिच्या पर्समधील कागदपत्रांवरून तिची ओळख पटली. पोलिसांनी नातेवाइकांशी संपर्क साधून बोलवून घेतले. आई व भावाने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. तिचा भाऊ अजय व्हनकटे याने पोलिसांत वर्दी दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Married spouse commits suicide because of ambiguity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.