नाट्यप्रेमींसाठी खुशखबर!, कोल्हापुरात सोमवारपासून सुरु होणार मराठी राज्य नाट्य स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:56 IST2025-11-05T13:55:32+5:302025-11-05T13:56:53+5:30
जिल्ह्यातील २६ संघ कला दाखवणार : शाहू स्मारक भवनमध्ये सर्व प्रयोग होणार

नाट्यप्रेमींसाठी खुशखबर!, कोल्हापुरात सोमवारपासून सुरु होणार मराठी राज्य नाट्य स्पर्धा
कोल्हापूर : तमाम हौशी नाट्यप्रेमींचे लक्ष लागून राहिलेली ६४व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला येत्या सोमवारपासून (दि. १० नोव्हेंबर) येथे सुरुवात होत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी शाहू स्मारक भवनात होईल. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबरच्या दरम्यान रोज संध्याकाळी सात वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. जळित झालेले केशवराव भोसले नाट्यगृह अजून तयार न झाल्याने नाट्यप्रयोग शाहू स्मारकमध्ये होत आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी सांगितले. स्पर्धेमध्ये एकूण २६ संघांचा सहभाग असून राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
दिवाळी झाली नाट्यकर्मींना या स्पर्धेचे वेध लागतात. वर्षभर कष्ट घेऊन अनेक संघ या स्पर्धेत आपली कला सादर करतात. व्यक्त होण्याचे सशक्त माध्यम म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. अनेक नव्या दमाच्या कलावंतांना आपल्या अंगातील कलागुण सादर करण्याची संधी ही स्पर्धा देते. कोल्हापुरात सर्वच नाटकांना रसिकांची चांगली गर्दी असते. लोक नाट्यकलेला भरभरून प्रतिसाद देतात.
स्पर्धेतील नाटके अशी (कंसात सादर करणारी संस्थेचे नाव)
- १० नोव्हेंबर : चिमणी (अभिरुची, कोल्हापूर)
- ११ : जी टू जी गेट टुगेदर (अवनी संस्था)
- १२ : काखंत कळसा आणि गावाला वळसा (भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र)
- १३. : अग्निकाष्ठ (गडहिंग्लज कला अकादमी)
- १४. : आपल्याला काय त्याचं? ( हर फौंडेशन, कोल्हापूर)
- १५ : धम्मप्रकाश (हृदयस्पर्श सोशल फौंडेशन, कोल्हापूर)
- १७ : भांडा सौख्य भरे (जाणीव चॅरिटेबल, फाउंडेशन)
- १८ : उसन्या बायकोची वरात लग्नाची (सकाळी ११:३० वाजता : क्रांतिसिंह नाना पाटीलनगर मित्रमंडळ)
- १८ : आधी बसू, मग बोलू ( सायंकाळी ७ वाजता, कोल्हापूर पेडियाट्रिक अकादमी)
- १९ : तू वेडा कुंभार (नाट्य शुभांगी, जयसिंगपूर)
- २० : काळोख देत हुंकार (नवनाट्य कलामंच, आजरा)
- २१ : मी कुमार (निष्पाप कलानिकेतन सेवा संस्था, इचलकरंजी)
- २३ : एक औरत हिपेशिया भी थी ( परिवर्तन फौंडेशन)
- २५ : वसुभूमी (फिनिक्स क्रिएशन)
- २७ : गेला बाजार (प्रज्ञान कला अकादमी वारणानगर)
- २८ : देणे ईश्वराचे (रंगयात्रा, इचलकरंजी)
- २ डिसेंबर : द फीलिंग पॅराडॉक्स ( रुद्रांश, कोल्हापूर)
- ३ : संयुक्त जत्राट-२ (एस. के. चॅरिटेबल ट्रस्ट, केर्ले)
- ४ : हायब्रीड (साई नाट्यधारा मंडळ, हलकर्णी, चंदगड)
- ५ : वायव्यनगर (संगीत-नाट्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ)
- ६ : सूर्य पाहिलेला माणूस (संगीतसूर्य फौंडेशन, पाचगाव)
- ८ : अ युजलेस जिनिअस (संगीतसूर्य केशवराव भोसले कला अकादमी)
- ९ : बायको असून देखणी (संस्कार भुयेवाडी)
- १० : आज महाराष्ट्र दिन आहे (तुकाराम माळी तालीम मंडळ)
- ११ : आय एम फीलिंग हॉर्नी (सुगुण नाट्यकला)
- १२ डिसेंबर : सावळे रक्तव्याज (वसंत शैक्षणिक कोडोली)