Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांची भेट उद्या किंवा बुधवारी, विशेष अधिवेशनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 11:27 IST2018-08-27T11:25:08+5:302018-08-27T11:27:30+5:30
मराठा आरक्षणावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार-आमदार यांना तारीख व वेळ द्यावी, अशी विनंती खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांची भेट उद्या किंवा बुधवारी, विशेष अधिवेशनाची मागणी
कोल्हापूर : मराठा आरक्षणावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार-आमदार यांना तारीख व वेळ द्यावी, अशी विनंती खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यांनी तारीख व वेळ कळवितो, असे सांगितले आहे. त्यानुसार उद्या, मंगळवारी किंवा बुधवारी (दि. २९) ही भेट होण्याची शक्यता आहे.
शनिवारी (दि. २५) सायंकाळी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील खासदार-आमदारांची बैठक झाली. यावेळी आमदार सर्वश्री. सतेज पाटील, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील-सरुडकर, संध्यादेवी कुपेकर, अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, आदींसह सकल मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते.
या बैठकीत मराठा आरक्षणाकरिता विशेष अधिवेशनाची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या, मंगळवारी भेट घेण्याचा निर्णय झाला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक असते. याच वेळी मुख्यमंत्र्याना भेटतो. फक्त खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांची वेळ घ्यावी, अशी सूचना केली होती.
त्यानुसार खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले असून, त्यांच्या भेटीची तारीख व वेळ मागितली आहे. त्यांच्याकडून तारीख व वेळ मिळाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार त्यांची भेट घेणार आहेत. उद्या, मंगळवारी किंवा बुधवारी (दि. २९) ही भेट होईल, असे शेट्टी यांनी सांगितले.