चंदगड : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला चंदगड शहरातील शिमगोत्सवात आबालवृद्धांसह ज्येष्ठांनी रामायण, महाभारतातील विविध व्यक्तिरेखांसह अनेक सोंगे साकारली होती. त्यात प्रेक्षकांच्या अमाप उत्साहामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आले होते. हा उत्सव पाहण्यासाठी गोवा, सीमाभागातील बेळगाव, कोल्हापूर व कोकणातील प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती.शुक्रवारी रात्री कुंभार गल्ली, ब्राह्मण गल्ली, रामदेव गल्ली, इलगे गल्ली, रवळनाथ गल्लीसह अनेक गल्लींतील नागरिकांनी रामायणातील राम, लक्ष्मण, सीता, रावण, हनुमान यासह वानरसेनेची सोंगे साकारली होती. तसेच महाभारतातील युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, दुर्योधन, कर्णासह विविध सोंगे सादर करण्यात आली. त्याला पारंपरिक वाद्यांच्या गजराची साथ यामुळे प्रेक्षकांच्या आनंदाला अमाप उधाण आले होते. हा शिमगोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यात गोवा, सीमाभागातील बेळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग यासह तालुक्यातील अनेक गावांतील प्रेक्षकांचा समावेश होता. पर्यावरण रक्षण, पृथ्वीवरील वाढते तापमान धोकादायक, मतदार जागृती यासह विविध सामाजिक प्रबोधनात्मक सोंगांचाही या शिमगोत्सवात समावेश होता. विशेष म्हणजे सहभागी कलाकार पायात काही न घालता अनवाणी रात्रभर नाचतात. रात्री उशिरापर्यंत हा उत्सव सुरू होता. पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
लाखोंचा खर्चप्रत्येक गल्लीत उत्साही लोकांसह सहभागी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आवश्यक आकर्षक वेशभूषा तसेच साहित्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला होता. त्यामुळे त्याला विलक्षण आकर्षण आले होते.लोकोत्सव बनणे गरजेचेशिमगोत्सवाला राजाश्रय मिळावा म्हणून राज्याच्या सांस्कृतिक धोरण समितीत असलेल्या प्रा. दौलत कांबळे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या शिमगोत्सवाचा सांस्कृतिक धोरणात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांनी या कलांचा लोकोत्सव भरवण्याची गरज आहे.