Kolhapur: केवळ पाच हजारांत बना बांधकाम कामगार; बडे शेतकरी, श्रीमंत लाभार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:55 IST2025-01-04T16:55:37+5:302025-01-04T16:55:54+5:30
खरा बांधकाम कामगार योजनेपासून दुरावत चालला

Kolhapur: केवळ पाच हजारांत बना बांधकाम कामगार; बडे शेतकरी, श्रीमंत लाभार्थी
दत्ता बिडकर
हातकणंगले : पाच हजार द्या आणि बांधकाम कामगार व्हा. इंजिनिअरच्या ९० दिवसांच्या कामाचा बोगस दाखला घ्या, बांधकाम कामगार बना, असा फंडा कामगार नोंदणीमध्ये सुरू आहे. चार-पाच एकरांचा शेतकरी आणि लाखो रुपयाच्या बंगल्याचा मालक, खासगी नोकरदार मंडळींपासून अनेकजण एजंटांच्या कृपेने थेट बांधकाम कामगार बनत असल्याने एजंट, इंजिनिअर आणि कामगार कार्यालयाच्या साखळीने जिल्ह्यात बांधकाम कामगार बनण्याचे पेव फुटले आहे. त्यामुळे खरा बांधकाम कामगार योजनेपासून दुरावत चालला आहे.
ज्याने कधी विट, दगड, सिमेंटच्या कामाला हात लावला नाही. कामाची साधी सवय नाही अशा व्यक्तीला बांधकाम कामगाराची नोंदणी सहज मिळत आहे. बांधकाम कामगाराने ९० दिवस काम केल्याचा दाखला योजनेसाठी आवश्यक असतो. असा दाखला देण्यासाठी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकामकडील परवानाधारक इंजिनिअर हजार-बाराशेचा ढपला पाडत आहेत. एजंट आणि त्यांचे पाठीराखे गावोगावी नोंदणीसाठी जनजागृती करत आहेत. एजंटांच्या भरमसाठ मागणीला कंटाळून ‘नोंदणी नको एजंट आवरा,’ म्हणण्याची वेळ खऱ्या कामगारांवर आली आहे.
बांधकाम कामगाराच्या ऑनलाईन नोंदणीसाठी ठेकेदाराच्या कार्यालयामध्ये दररोज झुंबड उडाली आहे. नोंदणी आणि नूतनीकरणासाठी ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचा दाखला सक्तीचा केला आहे. हा दाखला देण्यासाठी जिल्हा परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणी असलेला इंजिनिअर यांना शासनाने परवानगी दिली आहे. लाखो रुपयांच्या निविदांची कामे करणारे इंजिनिअर हजार-बाराशे रुपये घेऊन कामाची सवय नसलेल्या व्यक्तींना बोगस दाखले देत आहेत. एजंट, इंजिनिअर आणि कार्यालयाच्या मिलीभगतने काम करणारे कामगार या योजनेपासून बाजूला जात आहेत.
अशी होतेय लूट
बांधकाम कामगाराच्या जिवावर डॉक्टर, लॅबचालक, जेवण पुरवठादार ठेकेदार गब्बर झाले आहेत. कामगाराच्या रक्त आणि लघवी तपासणीसाठी ३९०० ची लूट ठराविक डॉक्टर आणि तपासणी करणारे लॅबचालक करत आहेत. बांधकाम कामगारांना पुरविले जाणारे जेवण कुठेतरी डाळ नाही तर गरम पाण्यावरच स्वार, भात आहे तर रोटी नाही. लोणचे, गुळाचा पत्ता नाही. यासाठी ठेकेदार ६० रुपये आकारत असल्याने ठेकेदार गब्बर झाले आहेत.
कामगारांच्या न्याय हक्क मागणीसाठी लाल बावटा तसेच इतर कामगार संघटना काम करत आहेत. शासनाने ठेकेदार पोसण्यासाठी खासगी कंपन्यांना कंत्राट दिली आहेत. गवंडी, सेट्रिंग कामगार ८०० रुपयांची हजेरी बुडवून दिवसभर रांगेत उभा राहत नाही. त्यामुळे कंपनी चालक एजंट बोगस नोंद करत आहे. कामगार कार्यालयांना मॅनेज करून दर ठरवून बोगस नोंदी करून कामगारांची लूट सुरू आहे. - कॉम्रेड आनंदराव गुरव, कामगार नेते, इचलकरंजी