कोल्हापुरात पुन्हा माणुसकीची भिंत - २, ३ नोव्हेंबरला सीपीआर चौकात उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:58 IST2018-10-24T23:53:44+5:302018-10-24T23:58:37+5:30
गरीब व गरजू नागरिकांची दिवाळी आनंददायी करण्यासाठी येत्या २ व ३ तारखेला पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहत आहे. या उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील सीपीआर चौकात कोल्हापूकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली जुनी परंतू वापरायोग्य कपडे गरजूंना देण्यात येणार आहेत.

कोल्हापुरात पुन्हा माणुसकीची भिंत - २, ३ नोव्हेंबरला सीपीआर चौकात उपक्रम
कोल्हापूर : गरीब व गरजू नागरिकांची दिवाळी आनंददायी करण्यासाठी येत्या २ व ३ तारखेला पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहत आहे. या उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील सीपीआर चौकात कोल्हापूकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली जुनी परंतू वापरायोग्य कपडे गरजूंना देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी या दोन्ही दिवशी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत वापरण्यायोग्य जुनी-नवी कपडे व साहित्य दान करावीत व गरजूंनी त्याचवेळी घेऊन जावीत, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.
आमदार पाटील म्हणाले, नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा, हे ब्रीद घेऊन माणुसकीची भिंत हा उपक्रम तीन वर्षांपासून राबवित आहे. उपक्रमाला दातृत्ववान कोल्हापूरकरांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे वापरता येतील असे तीन लाखांहून अधिक कपडे गरजू लोकांपर्यंत पोहोचविता आले.
कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचे अनुकरण करीत कोल्हापुरात इतर ठिकाणी, इचलकरंजी, पुणे, मुंबई, बिहार, छत्तीसगड यासह अन्य ठिकाणी माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या.मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, हे कपडे गरजू व्यक्ती वापरणार आहेत त्यामुळे ते देताना स्वच्छ धुवून शक्य असल्यास इस्त्री करून व पुरुष, मुले आणि महिला अशी वर्गवारी करून द्यावे.
या उपक्रमाच्या संयोजनासाठी विश्वास पाटील, संतोष पाटील, सुखदेव गिरी, सचिन पाटील, प्रशांत पोकळे, प्रसाद पाटील, अमर पाटील, सुरज पाटील, निनाद कामत, इम्तियाज मोमीन, डॉ. देवेंद्र रासकर, आदी परिश्रम घेत आहेत.
तीन लाखांहून अधिक कपड्यांचे वितरण
व्हॉटस अॅप ग्रुपवरील चर्चेतून दोन वर्षांपूर्वी माणुसकीची भिंत उपक्रमाची सुरुवात झाली.
पहिल्या वर्षी तीन दिवसाच्या उपक्रमात अडीच हजार नागरिकांनी वापरण्यायोग्य असे १ लाख ७९ हजार ८३० कपडे येथे दिले.
मागील वर्षी तीन हजार लोकांनी दोन लाखांहून अधिक कपडे दिले.
यंदा यातून शिल्लक राहणारे कपडे व वस्तू फिरस्ते, झोपडपट्टीत राहणारे गरजू, रस्त्याच्या कडेला झोपणारे भिकारी, ऊस तोडणी कामगारांना वाटण्यात येणार आहेत.
रविवारी स्वयंसेवकांची बैठक
उपक्रमाचे संयोजन व व्यवस्थापनासाठी रविवारी (दि. २८) दुपारी तीन वाजता अजिंक्यतारा कार्यालयात स्वयंसेवकांची बैठक आयोजित केली आहे. एकाचवेळी कपडे घेणे व त्याचे वाटप असा दुहेरी उपक्रम होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवावा व बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.