उसाच्या ट्रॉलीखाली सापडून कोगनोळीतील नागरिक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 15:44 IST2021-01-05T15:40:52+5:302021-01-05T15:44:37+5:30
Accident Kolhapur-मोटारसायकल घसरल्याने उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून झालेल्या अपघातात कोगनोळी (तालुका निपाणी) येथील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश पीरगोंडा पाटील (काका) (वय ७६) हे जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक ५ रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.

उसाच्या ट्रॉलीखाली सापडून कोगनोळीतील नागरिक ठार
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : मोटारसायकल घसरल्याने उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून झालेल्या अपघातात कोगनोळी (तालुका निपाणी) येथील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश पीरगोंडा पाटील (काका) (वय ७६) हे जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक ५ रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, की प्रकाश पाटील हे कोगनोळी बस स्थानकाकडून पी अँड पी सर्कलच्या दिशेने जात होते. लोखंडे गल्ली येथील भीम नगर जवळ आले असता रस्त्यावरील खडकावरून त्यांची मोटरसायकल घसरल्याने ते कागल येथील शाहू कारखान्याकडे जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉली खाली फेकले गेले. ट्रॉलीचे चाक त्यांच्या शरीरावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी ताबडतोब पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रॅक्टरचालक सौरभ राजाराम कोराने (वय २५) रा. नागाव तालुका करवीर यास ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. प्रकाश पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.