नाश्ता बनवण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 09:58 IST2019-03-25T09:57:37+5:302019-03-25T09:58:11+5:30
हत्येनंतर पती पोलिसांना शरण

नाश्ता बनवण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या
कोल्हापूर: पत्नीनं नाश्ता तयार करुन न दिल्यानं तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शिरसोलमध्ये घडली आहे. नायलॉनच्या दोरीनं पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर पती पोलिसांना शरण आला. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
शिरसोलमधील कुरुंदवाडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 49 वर्षीय रमेश गायकवाड यांचे पत्नी मंगल (38 वर्षे) सोबत वारंवार वाद व्हायचे. शनिवारी त्यांच्यात चहा, नाश्ता तयार करण्यावरुन भांडण झालं. 'रमेश आणि मंगलमध्ये लहानसहान गोष्टींवरुन वाद व्हायचे. शनिवारीदेखील त्यांच्यात भांडण झालं. रमेशचा सकाळपासून उपवास होता. त्यामुळे त्यानं संध्याकाळी पत्नी मंगलला नाश्ता बनवण्यास सांगितला. मात्र मंगलनं नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि मंगल तिचं सामान घेऊन माहेर जाण्यास निघाली,' अशी माहिती पोलिसांनी दिली.
मंगलनं बस स्टॉपजवळ असताना रमेश तिथे पोहोचला. त्यानं तिला घरी परत येण्यास सांगितलं. यावेळी मंगलनं शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या रमेशनं नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून तिची हत्या केली. याबद्दलची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर तो थेट कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानं घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर खुनाच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी त्याला अटक केली.