सरकारी नोकरीच्या आमिषाने घातला ७७ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 21:16 IST2018-03-21T21:16:49+5:302018-03-21T21:16:49+5:30
प्राप्तिकर, आरोग्य, बीएसएनएल, प्रादेशिक परिवहन, विविध बँका, अन्न व औषध पुरवठा आदी विविध सरकारी कार्यालयांत आपल्या ओळखी आहेत, अशी बतावणी करायचा.

सरकारी नोकरीच्या आमिषाने घातला ७७ लाखांचा गंडा
कोल्हापूर : सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोल्हापूरसह मुंबई, ठाणे येथील तरुणांना सुमारे ७७ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्यास जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली. संशयित प्रकाश गणपती जगताप (वय ४५ रा. नंदगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.
प्राप्तिकर, आरोग्य, बीएसएनएल, प्रादेशिक परिवहन, विविध बँका, अन्न व औषध पुरवठा आदी विविध सरकारी कार्यालयांत आपल्या ओळखी आहेत. त्या माध्यमातून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून प्रकाश जगताप याने तरुणांकडून ३ ते ५ लाख रुपये घेतले. पैसे दिलेल्या काही तरुणांना बोगस नियुक्ती पत्रे दिली. दि. २७ मे ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत भामटा जगताप याने कोल्हापुरातील भवानी मंडप, मुंबईतील दादर परिसरातील स्वामी नारायण मंदिर, ठाणे रेल्वे स्थानक आदी परिसरात तरुणांकडून पैसे घेतले. सर्व पैसे रेणुका मल्टिस्टेट पतसंस्था मर्या. बाबूजमाल कोल्हापूर या ठिकाणी आपल्या खात्यावर भरले होते. त्याने दिलेली नियुक्तीपत्रे बोगस असल्याचे लक्षात येताच तरुणांनी त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याचा फोन बंद असल्याचे लक्षात आले. यानंतर आपल्याला फसवण्यात आल्याचे संबंधित तरूणांच्या लक्षात आले. या तरुणांना प्रकाश जगतापविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.