राज्याप्रमाणेच कोल्हापूर महापालिकाही भाजपमुक्त करा : मोहम्मद प्रतापगढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 15:26 IST2021-01-04T15:07:12+5:302021-01-04T15:26:50+5:30
महाराष्ट्र राज्याची सत्ता ज्याप्रमाणे भाजपमुक्त केली, त्याचप्रमाणे कोल्हापूर महापालिकाही आगामी निवडणूकीत भाजपमु्क्त करा, असे आवाहन प्रख्यात कवी, काँग्रेसचे युवा नेते मोहम्मद इम्रान प्रतापगढी यांनी केले. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मंगळवार पेठेतील खासबाग चौक येथील जनसंपर्क कार्यालय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापुरातील आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते मोहम्मद इमरान प्रतापगढी, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील, प्रा. जयंत आसगावकर, निलोफर आजरेकर, आर.के. पोवार, राजेश लाटकर आदी उपस्थित होते. छाया : नसीर अत्तार
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याची सत्ता ज्याप्रमाणे भाजपमुक्त केली, त्याचप्रमाणे कोल्हापूर महापालिकाही आगामी निवडणूकीत भाजपमु्क्त करा, असे आवाहन प्रख्यात कवी, काँग्रेसचे युवा नेते मोहम्मद इम्रान प्रतापगढी यांनी केले. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मंगळवार पेठेतील खासबाग चौक येथील जनसंपर्क कार्यालय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रा. जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतापगढी यांनी काव्यशैलीत मोदी सरकारवर निशाणा साधला.
ते म्हणाले, भाजप नेहमी देशाला काँग्रेसमुक्त करण्याची गोष्ट करते. परंतु महाराष्ट्राच्या सत्तेतून भाजपमु्क्त करून देशात महाविकास आघाडीने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. येथील सरकारचे काम देशातील इतर राज्यांच्या तुलनेत चांगले आहे.
राज्यातील लोकांच्या मनात सरकारने घर केले आहे. वास्तविक कोल्हापूर महापालिकेमधूनच याची सुरुवात झाली होती. देशातून काँग्रेस मु्क्त करणार म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे. आगामी निवडणुकीत पूर्ण भाजपमुक्त महापालिका करावी. महाराष्ट्रातील सत्ता गेलेली भाजप पचवू शकलेली नाही. त्यामुळेच नेहमी सरकार पडण्याची भाष करते.
कोल्हापूरच्या मातीला आपला सलाम आहे. येथील कोल्हापुरी चपला, मिरची जगप्रसिद्ध आहेत. याच मिरचीने भाजपला ठसका देण्याचे काम केले. कोल्हापूरची संस्कृती ही ओळख आहे. कोरोनामध्येही हे तुम्ही दाखवून दिले आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न झाले. ईडी, आयकर मागे लावले. मात्र, शरद पवार यांच्यामुळे ते शक्य झाले नाही. महाविकास आघाडीची सरकार स्थापण्याचा पवारांचा पॉवर गेम मोदींसह भाजपला वरचढ ठरल्याचेही प्रतापगढी यांनी सांगितले.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले. आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अभय छाजेड, काँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेस शहराध्यक्षा संध्या घोटणे, माजी उपमहापौर संजय मोहिते, आदी उपस्थित होते.