Kolhapur Municipal Election 2026: बिगुल वाजला.. उमेदवारांनी शड्डू ठोकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:06 IST2025-12-16T13:05:59+5:302025-12-16T13:06:41+5:30
जागावाटपासाठी महायुती त्रिसदस्यीय समिती नेमणार, नागपूरमध्ये झाली बैठक

Kolhapur Municipal Election 2026: बिगुल वाजला.. उमेदवारांनी शड्डू ठोकला
तब्बल पाच वर्षे रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल सोमवारी वाजले. यामुळे इच्छुक उमेदवारांसह हवसे, नवशांची लगीनघाई सुरू झाली. प्रभागांमध्ये कार्यक्रमांचा धडाका लावत इच्छुकांनी नेत्यांसमोर उमेदवारीची दावेदारी केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याच पक्षाने अद्याप एकही उमेदवार जाहीर केला नसला तरी एका एका प्रभागात एका पक्षाकडून १५-१५ उमेदवार लढण्याची भाषा करत असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी निवडणुकीची घोषणा जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी सोशल मीडियावर ‘हम है तैयार’चा नारा दिला.
जागावाटपासाठी महायुती त्रिसदस्यीय समिती नेमणार, नागपूरमध्ये झाली बैठक
कोल्हापूर : येथील महापालिकेच्या निवडणुकीच्या जागावाटपाबाबत दोनच दिवसांपूर्वी नागपूरमध्ये बैठक झाली आहे. यावेळी महायुतीमधील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची प्रत्येकी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय झाला आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक उपस्थित होते. आमदार राजेश क्षीरसागर हे उदयपूरला एका विवाह समारंभासाठी गेले होते. त्यामुळे ते अनुपस्थित होते असे सांगण्यात आले. परंतु, या बैठकीतील निर्णय त्यांनाही कळविण्यात आला आहे.
वाचा - दोन्ही आघाड्यांकडून मोर्चेबांधणीला वेग, प्रशासनाचीही लगबग
यावेळी महायुतीमधील तीनही पक्षांनी प्रत्येकी त्रिसदस्यीय समिती नेमावी आणि वाॅर्डनिहाय उमेदवारांची यादी तयार करावी. ज्या ठिकाणी एकमत होईल त्या ठिकाणी काही प्रश्न येणार नाही. परंतु, जिथे दुमत असेल त्या ठिकाणी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणामध्ये नेमके कोण पुढे असेल त्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
समितीमधील संभाव्य नावे
भाजपकडून या समितीमध्ये आमदार अमल महाडिक, जयंत पाटील, विजय जाधव यांचा समावेश होऊ शकतो, तर शिंदेसेनेच्या समितीमध्ये आमदार राजेश क्षीरसागर, समन्वयक नाना कदम, शारंगधर देशमुख यांच्या नावांची चर्चा आहे, तर राष्ट्रवादीकडून आदिल फरास यांच्यासह आणखी दोन प्रमुख कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
वाचा : दहा वर्षांनंतर होणार निवडणूक, उमेदवारांसह नेत्यांनीही सोडला सुटकेचा नि:श्वास
इचलकरंजीत राष्ट्रवादी भाजपच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत
एकीकडे कोल्हापूरमध्ये महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असताना इचलकरंजीत मात्र अजूनही महायुतीचे काही ठरले की नाही हे जाहीर झालेले नाही. इचलकरंजीमध्ये भाजपचे नेतृत्व माजी आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर करीत आहेत. त्यांच्याकडून आम्हांला अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद नाही असे सांगत आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच कोणत्याही निवडणुकीला सज्ज असतो. त्यानुसार आम्ही तयारी केली आहे. इचलकरंजीतून भाजपकडून आम्हांला प्रतिसादाची अपेक्षा आहे. कोल्हापूरमध्ये महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. - हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षणमंत्री