Kolhapur Municipal Corporation Election: निवडणुकीचे वारे...सगळेच शोधताहेत ताकदीचे चेहरे
By पोपट केशव पवार | Updated: October 27, 2025 17:03 IST2025-10-27T17:02:58+5:302025-10-27T17:03:27+5:30
एका प्रभागात १५ ते २० पेक्षा जास्त उमेदवार इच्छुक

Kolhapur Municipal Corporation Election: निवडणुकीचे वारे...सगळेच शोधताहेत ताकदीचे चेहरे
पोपट पवार
कोल्हापूर : तब्बल पाच ते सहा वर्षांनंतर होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात तगडे उमेदवार उतरवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एका एका प्रभागात १५ ते २० पेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असले तरी उमेदवाराची आर्थिक व सामाजिक ताकद पाहून चेहरे निवडावे लागणार आहेत.
त्यामुळे काँग्रेससह भाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी व उद्धवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा कस लागणार आहे. महापालिकेच्या २० ही प्रभागांमध्ये आपल्या पक्षातून कितीजण इच्छुक आहेत याची चाचपणी नेत्यांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे ताकदीचे उमेदवार आपल्या तंबूत आणण्यासाठी स्थानिक नेत्यांनी अनेकांवर 'गळ' टाकला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. यासाठी २० प्रभागातून ८१ उमेदवार निवडले जाणार आहेत. ही निवडणूक एकत्रित लढवायची की स्वबळावर याचे चित्र अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने सर्वच पक्षांनी सर्व प्रभागांमध्ये तयारी सुरू केली आहे. आप, मनसे व डाव्या पक्षांनीही या निवडणुकीसाठी हालचाल सुरू केली आहे.
सध्या प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार निवडण्यासाठी चाचपणी सुरू आहे. कार्यकर्त्यांनी केंद्रनिहाय वेगवेगळ्या पातळीवर कामही सुरू केले आहे. - सचिन चव्हाण, शहराध्यक्ष, काँग्रेस, कोल्हापूर.
निवडणुकीसाठी सर्व प्रभागांमध्ये आमची तयारी पूर्ण झाली आहे. उमेदवारांची चाचपणीही केली आहे; मात्र महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. - सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना, कोल्हापूर.
महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढवणार आहोत. या निवडणुकीत आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात अशी मागणी आम्ही चार दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत वरिष्ठांकडे केली आहे. अजून आरक्षण जाहीर झालेले नाही. ते झाले की उमेदवार ठरवू. -आर.के.पोवार, शहराध्यक्ष, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, कोल्हापूर.
सध्या आमच्याकडे ६५ इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत. मात्र, महायुती म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत.युती झाली नाही तर मैत्रिपूर्ण लढू. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील अनेकजण आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. -आदिल फरास, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, कोल्हापूर.
महापालिका निवडणुकीसाठी सध्या आमच्याकडे २५ उमेदवार तयार आहेत. ही निवडणूक एकत्रित लढवण्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील; पण ही निवडणूक उद्धवसेना व मनसे एकत्र लढवणार हे निश्चित आहे. - रविकिरण इंगवले, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना, कोल्हापूर.