महाविकास आघाडीचं ठरलं, कोल्हापूर जिल्ह्यात सर्व निवडणुका एकत्र लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:20 IST2025-11-08T18:19:39+5:302025-11-08T18:20:32+5:30
जागावाटप सामोपचाराने, पण अंतिम निर्णय सतेज पाटील यांच्या हाती

महाविकास आघाडीचं ठरलं, कोल्हापूर जिल्ह्यात सर्व निवडणुका एकत्र लढणार
कोल्हापूर : जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी व इंडिया आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. अजिंक्यतारा कार्यालयात महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धवसेना, शरद पवार गटाची निवडणुकांसंदर्भात प्राथमिक बैठक झाली.
या बैठकीत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार सुनील प्रभू, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार राजीव आवळे, उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, नितीन बानुगडे-पाटील, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, रविकिरण इंगवले, सचिन चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
सध्या नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पुढील दोन महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सुनील मोदी, राजू लाटकर, आर. के. पोवार, आनंद माने, बाळासाहेब सरनाईक, सुभाष बुचडे, दुर्वास कदम, भारती पोवार, बयाजी शेळके उपस्थित होते.
जागावाटप सामोपचाराने, पण अंतिम निर्णय सतेज पाटील यांच्या हाती
या बैठकीत केवळ एकत्र येण्यावर चर्चा करण्यात आली. नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष, नगरसेवकांचे जागा वाटप त्या त्या पक्षांचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष चर्चा करून सामोपचाराने करतील असे सांगत या जागा वाटपात कुठे तिढा आलाच तर त्याचा निर्णय आमदार सतेज पाटील घेतील असे विनायक राऊत यांनी सांगितले.
शेतकरी संघटनेसोबत दोन दिवसांत बैठक
आगामी निवडणुका केवळ महाविकास आघाडीच नाही तर इंडिया आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत. येत्या दोन दिवसांत खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका महाविकास व इंडिया आघाडी म्हणून एकत्र लढवण्यात येणार आहेत. आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. दोन दिवसांत इंडिया आघाडी व शेतकरी संघटनेसोबत बैठक घेण्यात येणार आहे. - आ. सतेज पाटील, गटनेते, विधानपरिषद, काँग्रेस.