Maharashtra Floods : दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 02:53 PM2019-08-10T14:53:38+5:302019-08-10T15:07:49+5:30

कोल्हापूर, चिखली, आंबेवाडी, शिरोळ येथील पूरग्रस्तांना मदतीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील अन्य दुर्गम भागातील  पूरबाधित गावातील पुरग्रस्तांना शासकीय व अन्य कोणत्याही स्वयंसेवी संस्थांचा कोणताही मदतीचा हात पुढे आला नाही.

Maharashtra Floods heavy rain in nave pargaon and peth vadgaon | Maharashtra Floods : दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित

Maharashtra Floods : दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित

googlenewsNext
ठळक मुद्देदुर्गम भागातील काही भागात नदीचा महापूर अद्याप ओसरला नाही. महापुराने जनतेची दयनीय अवस्था झाली आहे. कोणत्याही शासकीय मदतीचा हात पोहचला नाही.

दिलीप चरणे / सुहास जाधव

नवे पारगाव / पेठ वडगाव - कोल्हापूर, चिखली, आंबेवाडी, शिरोळ येथील पूरग्रस्तांना मदतीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील अन्य दुर्गम भागातील  पूरबाधित गावातील पुरग्रस्तांना शासकीय व अन्य कोणत्याही स्वयंसेवी संस्थांचा कोणताही मदतीचा हात पुढे आला नाही. हे महापुरातील मदतीचे भीषण वास्तव आहे. प्राथमिक सुविधांचाही इथे बोजवारा उडाला आहे. 

दुर्गम भागातील काही भागात नदीचा महापूर अद्याप ओसरला नाही. महापुराने जनतेची दयनीय अवस्था झाली आहे. कोणत्याही शासकीय मदतीचा हात पोहचला नाही. मदतीला धावणाऱ्या कोणत्याही स्वयंसेवी संघटना या खऱ्या दुर्गम पूरग्रस्तांना मदत करायला पुढे आलेल्या नाहीत.

जिल्ह्यातील दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पन्हाळा तालुक्यात 66 गावांच्या पैकी 40 गावे ही  पूरबाधित आहेत. या ठिकाणी कळे मदत केंद्रात फक्त एकच बोट उपलब्ध असून त्यालाही चालक नाही. त्यामुळे ती पडूनच आहे. या तालुक्यातील बाजार भोगाव, कळे,यवलुज, पडळ, कोतोली, कोलोली या ठिकाणी अद्याप कोणतीही ही मदत पोहोचलेली नाही.

शाहुवाडी तालुक्यातील दहा ते बारा गावांशी संपर्क नसून त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू संपल्याने तेथील नागरिक हवालदील झाले आहेत. कांते, पारले, बरकी, मरळी पावरडी, सोंडोली, रेठरे, मानेवाडी, शित्तुर - वारूण, वारूळ, थेरगाव, वारणा कापशी, वाडीचरण येथील नदीकाठच्या गावांना कोणत्याही प्रकारचे मदत पोहोचलेली नाही.

आरोग्य सुविधाची ही वानवा झाली आहे. पंचवीस जुलैपासून कासारी नदीवरील पाल, बर्की बंधाऱ्यावर पाणी आल्याने पाल इजोली, सावर्डी, बर्की, मरळे, बुराणवाडी, कोटकरवाडी, दाभोळकरवाडी या गावांचा अद्यापही संपर्क तुटला आहे. तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी या बंधाऱ्यातील पाणी न उतरल्याने लोकांनी खायचे काय? असा प्रश्न पूरग्रस्त विचारत आहेत. घरातील सर्व धान्य, किराणा, औषधपाणी संपल्याने उपासमारीची वेळ आली आहे. 

एका महिन्यापासून आरोग्याच्या कोणत्याच सुविधा नसल्याने अनेकजण आजारी आहेत .त्या गावांपर्यंत कोणतीही शासकीय मदत व सहकार्य मिळालेले नाही. या परिसरातील वीज पुरवठा एक महिन्यापासून खंडीत झाला आहे. महावितरणने वीज पुरवठा सुरू करण्याची गरज आहे. वीज नसल्यामुळे सर्व दूरध्वनी सेवा बंद झाल्या आहेत. त्यामुळे कासारी खोऱ्यात प्राथमिक सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे.  या परिसरात दळणवळण व सर्व सुविधा पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. गडहिंग्लज तालुक्‍यातील पूरबाधित हिटणी, निलजे, हेब्बाळ, धोंडगे, जरळी, भडगाव, कडलगे, नांगनूर या गावांना अजून कोणतंही साहाय्य मिळालेलं नाही.

हवालदिल पुरग्रस्तांचे आवाहन

दुर्गम भागातील पूरग्रस्त नागरिकांची महापुरामुळे घरे पडल्याने लोक बेघर झाले आहेत. बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरे दगावली आहेत. पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे नुकसान भरपाईचे पंचनामे तात्काळ व्हावेत. सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा मदत करण्याची हाक पूरग्रस्त नागरिकांतून दिली जात आहे.

 

Web Title: Maharashtra Floods heavy rain in nave pargaon and peth vadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.