महाराणी ताराबाई यांचा शौर्यशाली इतिहास जगासमोर येणे गरजेचे, डॉ. प्रा. जयसिंगराव पवार यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:43 IST2024-12-23T12:43:11+5:302024-12-23T12:43:48+5:30
पन्हाळ्यात मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई विद्वत परिषद

महाराणी ताराबाई यांचा शौर्यशाली इतिहास जगासमोर येणे गरजेचे, डॉ. प्रा. जयसिंगराव पवार यांचे मत
पन्हाळा : महाराणी ताराबाई यांच्या राज्य कारभाराचा, त्यांनी गाजवलेल्या शौर्याचा इतिहास प्रसिद्धीपासून दूर आहे. तो महाराष्ट्रातच नाही, तर जगासमोर येणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रा. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले. ते राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पन्हाळगडावर महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त आयोजित मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई विद्वत परिषदेत बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे खा. शाहू छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
डॉ. प्रा. जयसिंगराव पवार म्हणाले की, छत्रपती ताराबाई यांचा उपेक्षित इतिहास जनतेसमोर नसल्याने मी तो मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आठशे पानांचा छत्रपती ताराबाईंचा इतिहास येत्या जानेवारीत न्यू पॅलेसमध्ये खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते प्रकाशन करणार आहोत. त्यातील प्रसंग सांगताना प्रा. पवार म्हणाले की, अमेरिकेतील रिचर्ड लॅटिन हे भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते. त्यांच्या भेटीत रिचर्ड लॅटिन म्हणतात की, संपूर्ण जगाच्या इतिहासात मध्ययुगीन काळातील कर्तृत्ववान महिला या एकमेव छत्रपती ताराबाई होत्या, पण त्यांचा इतिहास जगासमोर आला नाही.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले की, छत्रपती ताराबाई यांनी स्वराज्याचे रक्षण केले, हे महत्त्व महाराष्ट्रातील जनतेला अजूनही समजलेच नाही. मग जगासमोर कसे येणार. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या परिषदेबद्दल त्यांचे आभार मानतो. यावेळी शाहीर आझाद नायकवडी आणि सहकाऱ्यांनी पोवड्याचे सादरीकरण करून परिसर शिवमय केला होता.
ताराबाई यांचा पन्हाळगडावर पुतळा उभारावा
छत्रपती ताराबाई यांचा पुतळा पन्हाळगडावर उभा करावा, ही मागणी पन्हाळ्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे केली. ती तत्काळ मान्य करत, त्यासाठी लागणारे निवेदन तयार करवून घेतले. त्या निवेदनावर पहिली सही त्यांनी स्वतः केली, तर दुसरी सही डॉ. प्रा. जयसिंगराव पवार यांनी केली.