स्वराज्यनिर्मितीत महाराणी ताराराणींचे योगदान मोलाचे - शाहू छत्रपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:48 IST2025-12-11T11:47:47+5:302025-12-11T11:48:10+5:30
'महाराणी ताराराणी या महिलेने राज्य स्थापन करून ते चालवणे ही जगातील एकमेव घटना असेल'

स्वराज्यनिर्मितीत महाराणी ताराराणींचे योगदान मोलाचे - शाहू छत्रपती
कोल्हापूर : मोगल साम्राज्याशी संघर्ष करीत महाराणी ताराराणी यांनी महाराष्ट्रात स्वराज्यनिर्मिती करण्यात मोलाचे योगदान दिले, असे मत बुधवारी खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा येथील मेजर स्वाती संतोष महाडिक यांना मान्यवरांच्या हस्ते महाराणी ताराराणी पुरस्कार देण्यात आला.हा कार्यक्रम शाहू स्मारक भवनात झाला.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज यांच्यानंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष केला. मोगल साम्राज्य परतवून लावले. औरंगजेब यांच्या सैनिकांशी लढाया करून त्या जिंकल्या. त्या काळी विरोधकांकडून अनेक ऑफर दाखवल्या जात होत्या. मात्र त्यांनी त्या धुडकावून लावल्या.
संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यासारख्या अनेक मावळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्यनिर्मितीसाठी कर्तबगारी गाजवली. त्यांची प्रेरणा मेजर स्वाती महाडिक यांनी घेतली. पती संतोष महाडिक यांना वीरमरण आल्यानंतर खचून न जाता मोठ्या जिद्दीने हातात बंदूक घेऊन त्या देशसेवेत रुजू झाल्या, हे कौतुकास्पद आहे.
मेजर स्वाती महाडिक म्हणाल्या, पती कर्नल संतोष महाडिक यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्या क्षणी आयुष्य संपल्यासारखे वाटले; पण माझ्या पतींनी आयुष्यभर जे शिकवले, ते माझ्या मनात घर करून होते. म्हणून मीही देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. पतीच्या वीरमरणाच्या दु़:खातून सावरत, महाराणी ताराराणी यांची प्रेरणा घेत मी लष्करात दाखल झाले.
कर्नल अमरसिंह सावंत यांचे भाषण झाले. कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, मेजर जनरल एम. एन. काशीद, कर्नल विक्रम नलावडे, शिवाजीराव परुळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सी. एम. गायकवाड, विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शैलजा भोसले यांनी आभार मानले.
जगातील एकमेव घटना
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ‘महाराणी ताराबाई - एक अभ्यास’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी महाराणी ताराराणी या महिलेने राज्य स्थापन करून ते चालवणे ही जगातील एकमेव घटना असेल, असे मत मांडले. यामुळे महिला सबलीकरणासाठी त्यांचे चरित्र खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.