कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाकडील ‘महादेवी’ पाठवणार गुजरातला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:33 IST2025-07-18T12:32:07+5:302025-07-18T12:33:20+5:30

न्यायालयाचा निकाल : कोल्हापूरच्या न्यासाला दोन आठवड्यांची मुदत

Mahadevi elephant from Nandani Math in Kolhapur district will be sent to Gujarat | कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाकडील ‘महादेवी’ पाठवणार गुजरातला

संग्रहित छाया

कोल्हापूर : एका बाजूला प्राण्याच्या ‘गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा’ आणि दुसऱ्या बाजूला माणसाच्या विशेषतः धार्मिक विधींसाठी हत्तींच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना, प्राण्याच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (दि. १६) नोंदवले.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाकडे तीन दशकांहून अधिक काळ ताब्यात असलेल्या ‘महादेवी’ नावाच्या हत्तीला गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील राधे-कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती पुनर्वसन केंद्राकडे दोन आठवड्यांच्या आत हलविण्याची परवानगी न्यायालयाने यावेळी दिली. या प्रक्रियेसाठी दोन्ही राज्यांच्या मुख्य वन्यजीव अधिकाऱ्यांना आवश्यक परवाने देण्याचे आदेशही दिले आहेत.

शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाकडे १९९२ पासून हत्तीण आहे. वनविभागाची अनिवार्य परवानगी न घेता तेलंगणा येथे मिरवणुकीत या हत्तिणीला सहभागी केल्याचा आरोप प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या ‘पेटा’ने केला होता. याची छायाचित्रेही न्यायालयात सादर केली होती. न्यायालयाने याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चधिकार समितीने जून आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये हत्तिणीच्या तपासण्या करून अहवाल सादर केले.

२०२३च्या निर्णयाला आव्हान

समितीने २०२३ मध्ये या हत्तिणीला गुजरातच्या ‘वनतारा’ येथे पाठवण्याचा सल्ला दिला होता. कोल्हापूर आणि कर्नाटक सीमारेषेवरील गावकऱ्यांचे या हत्तिणीशी भावनिक आणि आध्यात्मिक नाते आहे. त्यामुळे मठाने या निर्णयाला आव्हान दिले होते. ती याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने फेटाळली.

Web Title: Mahadevi elephant from Nandani Math in Kolhapur district will be sent to Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.