कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत मोठे षड्यंत्र घडवून आणले. विरोधकांना 'बाय' देण्याचे काम केले. आम्हाला शाहू घराण्याबद्दल आदर आहे. लोकसभेला ज्यांनी उद्धव ठाकरे यांना फसवले त्यांच्या पराभवासाठी खासदार शाहू छत्रपती यांच्या विजयासाठी शिवसैनिक राबला; पण विधानसभेला मधुरिमाराजे यांनी का माघार घेतली? हे शिवसैनिकांना सांगायला हवे होते. अशी विचारणा उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.संजय पवार म्हणाले, विधानसभेला पक्षातील अनेक जण इच्छुक होते. पक्षाला उमेदवारी घेतली असती तर निश्चितच येथे ‘मशाल’ यशस्वी झाली असती; पण ही जागा ‘उद्धवसेने’ला मिळूच नये, यासाठी काहींनी फिल्डिंग लावली होती. पक्षाने ही जागा सोडून ‘राधानगरी’तून के. पी. पाटील यांना उमेदवारी दिली. ते आता कोठे आहेत? लोकसभेला शाहू छत्रपतींसाठी शिवसैनिक इर्षेने लढला.विधानसभेला मधुरिमाराजेंना उमेदवारी मिळाल्याचेही आम्ही स्वागत केले; पण त्यांनी अचानक माघार का घेतली? हे शिवसैनिकांना सांगायला हवे होते. राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली, पण त्यावेळी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेते कोठे हाेते? माजी आमदार मालोजीराजे यांचे पदाधिकारी कोठे होते? त्यांच्या सासूबाईंनी (राजलक्ष्मी खानविलकर) ‘करवीर’मध्ये कोणाला पाठिंबा दिला होता. हे न कळण्याइतके आम्ही खुळे नाही, असा पलटवारही त्यांनी केला.विधानसभेची जखम ओलीचविधानसभेला पक्षाला जागा घेतली असती तर यश-अपयश सोडा, पण ‘मशाल’ घराघरात पोहोचली असती. हा निर्णय खूपच जिव्हारी लागला असून, विधानसभेची जखम अजून ओली असल्याचे पवार यांनी सांगताच त्यांचे डोळे पाणावले.
Kolhapur: विधानसभा निवडणुकीत मोठे षड्यंत्र, विरोधकांना चाल देण्यासाठी मधुरिमाराजेंची माघार; संजय पवार यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:11 IST