‘कोजिमाशि’त पुन्हा दादांचेच ‘लाड’

By Admin | Updated: April 21, 2015 00:59 IST2015-04-21T00:58:05+5:302015-04-21T00:59:38+5:30

महाआघाडीला चार जागा : शेवटपर्यंत उत्कंठा ताणली; सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडीची हॅट्ट्रिक

'Love' again in 'Kojimaash' | ‘कोजिमाशि’त पुन्हा दादांचेच ‘लाड’

‘कोजिमाशि’त पुन्हा दादांचेच ‘लाड’

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या (कोजिमाशि) पंचवार्षिक निवडणुकीत पतसंस्थेचे अध्यक्ष व स्वाभिमानी सहकार आघाडीचे नेते दादासाहेब लाड यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. २१ पैकी १७ जागा जिंकत पतसंस्थेवर पुन्हा पकड घट्ट केली असून, विरोधी महाआघाडीला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. काटाजोड लढतीमुळे शेवटपर्यंत सत्तेचा लंबक इकडून-तिकडे झुकत होता.
‘कोजिमाशि’ पतसंस्थेसाठी दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी सहकार आघाडी व राजेंद्र रानमाळे, प्रा. जयंत आसगांवकर, एम. एम. गळदगे, राम पाटील, गणपतराव बागडी, आदींच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू परिवर्तन महाआघाडीत दुरंगी लढत झाली. पतसंस्थेच्या कारभाराबरोबर व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक चांगलीच गाजली. त्याचे पडसाद मतदानापर्यंत दिसले. चुरशीने ९०.५३ टक्के मतदान झाले. सोमवारी बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये मतमोजणी झाली. सर्वसाधारण गटातील सोळा जागांसाठी पहिल्यांदा मोजणी केली, पहिल्या फेरीत सत्तारूढ गटातील तेरा उमेदवार, तर महाआघाडीतील राजेंद्र रानमाळे, अरविंद किल्लेदार, शहाजी पाटील यांनी आघाडी घेतली. ही शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. सत्तारूढ गटाचे गौतम पाटील यांचा अवघ्या चार मतांनी पराभव झाला. कृष्णात खाडे यांनी सुरुवातीपासून पहिल्या फेरीपासून विजयी उमेदवारांच्यामध्ये अव्वल स्थान कायम ठेवले होते. महिला गटातील मतमोजणीत कमालीची चुरस झाली. सुलोचना कोळी, पुष्पलता चोपडे व अंजली जाधव यांच्यात मतांत चढाओढ सुरू होती. त्यामध्ये सत्तारूढ गटाच्या जाधव व महाआघाडीच्या कोळी यांनी बाजी मारली. अनुसूचित जाती गटातही शेवटच्या फेरीपर्यंत झुंज पाहावयास मिळाली. निकालानंतर ‘सत्तारूढ’ समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत विजयी जल्लोष केला.


गेल्या अकरा वर्षांतील सभासदाभिमुख कारभाराची पोचपावती सभासदांनी दिली. सर्व शिक्षक संघटनांचे नेते एका बाजूला असताना स्वाभिमानी सभासदांच्या बळावर विजयाची हॅट्ट्रिक केली. माझ्यावर केलेले आरोप पुसून सभासदांनी स्वयंघोषित नेत्यांना चोख उत्तर दिले. संस्थेच्या हिताविरोधात वागणाऱ्यांना थोपविले, याला कोणी दादागिरी म्हणत असेल तर येथून पुढेही मी करणार.
- दादासाहेब लाड (नेते, स्वाभिमानी सहकार आघाडी)

कमी फरकाने आमचा पराभव झाला, तरीही सभासदांचा कौल मान्य आहे. गेली पाच वर्षे सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभाराविरोधात संघर्ष केला. अजूनही आम्हाला संघर्ष करावा लागणार असेल, तर सभासदांच्या हितासाठी तो करूच. आम्ही चौघे जरी असलो तरी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अंकुश ठेवू. - राजेंद्र रानमाळे (नेते, राजर्षी शाहू परिवर्तन महाआघाडी)

Web Title: 'Love' again in 'Kojimaash'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.