इचलकरंजी यंत्रमागाच्या ‘अच्छे दिन’साठी गुजरात निकालाकडे लक्ष,मोदी सरकारकडून सुविधा, सवलतींची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:40 IST2017-12-16T00:39:13+5:302017-12-16T00:40:21+5:30
इचलकरंजी : गुजरात राज्यातील निवडणुकीनंतर वस्त्रोद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी मोदी सरकारकडून काही सुविधा व सवलती मिळतील.

इचलकरंजी यंत्रमागाच्या ‘अच्छे दिन’साठी गुजरात निकालाकडे लक्ष,मोदी सरकारकडून सुविधा, सवलतींची अपेक्षा
इचलकरंजी : गुजरात राज्यातील निवडणुकीनंतर वस्त्रोद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी मोदी सरकारकडून काही सुविधा व सवलती मिळतील. त्यामुळे येथील यंत्रमाग उद्योगाला ‘अच्छे दिन’ येतील, अशा अपेक्षेने यंत्रमागधारकांचे लक्ष गुजरात व हिमाचल प्रदेशातील निवडणूक निकालाकडे लागले आहे.
गेल्या सुमारे तीन वर्षांपासून यंत्रमाग उद्योगात कमालीची आर्थिक मंदी आहे. त्याचा परिणाम येथील कापड बाजारावर पर्यायाने यंत्रमागधारकांच्या आर्थिक उलाढालीवर झाला आहे. इचलकरंजी शहरातील कापडासाठी अहमदाबाद ही मोठी बाजारपेठ आहे. त्याचबरोबर अहमदाबाद व सुरत ही दोन्ही वस्त्रोद्योगातील मोठी केंद्रे आहेत.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत वस्त्रोद्योगाच्या आर्थिक मंदीचा विषय तेथील सत्तारूढ भाजपाला जाणवला आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर वस्त्रोद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी मोदी सरकारला यंत्रमाग उद्योगासाठी सुविधा व सवलती देण्याच्यादृष्टीने गांभीर्याने विचार करावा लागेल, अशी आशा येथील यंत्रमाग उद्योजकांना वाटत आहे. दरम्यान, विदर्भ व मराठवाड्यात कापसाच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बाजारातील कापसाचे दर वाढलेले आहेत.
वस्त्रोद्योगाचा सरकारला विचार करावा लागेल
गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांत कापडाच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. इचलकरंजी शहर व परिसरातील कोट्यवधींचे कापड दररोज गुजरातमधील अहमदाबाद व राजस्थानमधील पाली-बालोत्रा व जोधपूर या पेठांमध्ये जाते. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे साहजिकच वस्त्रोद्योगाला ‘अच्छे दिन’ यावेत म्हणून सरकारला निश्चितपणे विचार करावा लागेल, अशी अपेक्षा इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी व्यक्त केली.