एकरकमी एफआरपी अशक्य, कारखाने बंद ठेवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:45 IST2019-01-31T18:42:44+5:302019-01-31T18:45:31+5:30
आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देणे अजिबात शक्य नाही, टप्प्याटप्प्याने ती अदा करीत आहोत, तरीही आमच्यावर कारवाई करणार असाल तर आम्ही हतबल आहोत. कारखाने बंद ठेवतो, असा इशारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला.

एकरकमी एफआरपी अशक्य, कारखाने बंद ठेवू
कोल्हापूर : आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देणे अजिबात शक्य नाही, टप्प्याटप्प्याने ती अदा करीत आहोत, तरीही आमच्यावर कारवाई करणार असाल तर आम्ही हतबल आहोत. कारखाने बंद ठेवतो, असा इशारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला.
तुम्ही हतबल असाल तर आम्ही कारखाने चालविण्यास सक्षम आहोत, आमच्याकडे चाव्या द्या, असे प्रत्युत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले. दरम्यान, आरआरसीच्या कारवाईस होणाऱ्या दिरंगाईवरून स्वाभिमानीने जिल्हाधिकारी व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला.
बुधवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी थकविणाऱ्यां कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्याचे गुरुवारी जिल्ह्यात पडसाद उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा करण्यासाठी येणार असल्याची कुणकुण लागताच तत्पूर्वीच जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळात आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, दत्त शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्यासह आरआरसीची नोटीस लागू झालेल्या कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचा समावेश होता.