शिवजयंतीला आणुरमध्ये महिलांनी घरा-दारांची केली स्वच्छता, सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 20:48 IST2020-02-20T20:15:54+5:302020-02-20T20:48:07+5:30
महिलांनी आपल्या घरा-दारांची स्वच्छता करत सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट केली होती. तर प्रत्येकाने घरासमोर भगव्या ध्वजाची गुडी उभी करुन मिरवणुकीचे आनोखे स्वागत केले.यावेळी कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यामुळे आणूर गाव शिवमय झाले होते.

आणूर येथे संयुक्त लोकोत्सव शिवजयंती साजरी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये सर्व मंडळाचे कार्यकर्ते,गावकरी उत्साहाने सहभागी झाले होते. -- छाया. प्रभाकर खोत
म्हाकवे --आणुर(ता.कागल)येथे गेल्या चार वर्षाच्या परंपरेप्रमाणे सर्व मंडळे,गट-तटाच्या कार्यकर्त्यासह ग्रामस्थांनी एकत्रित येत यंदाही शिवजयंती लोकोत्सव साजरा केला.सजविलेला रथ,घोडयावर स्वार होत छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ च्या वेशभूषा केलेली मुले...कडाडणारी हलगी...कैताळाचा निनाद.. सनईचा सुर..तुतारीचा झंकार...जय भवानी.. जय शिवाजी.. जय शिवाजी...जय जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज की जय...असा अखंड जयघोषाने गाव दणाणून गेले होते.अशा नयनरम्य वातावरणात निघालेल्या मिरवणूक सोहळ्यात शाळकरी मुलांसह महिलां, गावकरीही तल्लीन होऊन सहभागी झाले होते.
महिलांनी आपल्या घरा-दारांची स्वच्छता करत सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट केली होती. तर प्रत्येकाने घरासमोर भगव्या ध्वजाची गुडी उभी करुन मिरवणुकीचे आनोखे स्वागत केले.यावेळी कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यामुळे आणूर गाव शिवमय झाले होते.
गावातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या मल्लांच्या हस्ते शिवाजी महाराजांची मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. मिरवणुकीचे चौका-चौकात स्वागत झाले. यावेळी अनेकांनी चहापान,सरबत,अल्पोपहारही देवू केला.
सामाजिकतेची किनार...
तीन दिवसापासून गावातील सर्व कार्यकर्ते एकसंध होत स्वच्छता मोहीम,रक्तदान,आरोग्य तपासणी शिबिर घेत आहेत. तसेच, महिलांसाठी सौ.सारिका पाटील यांचे मार्गदर्शन, संभाजी यादव-कौलवकर यांचा हसण्यासाठी जगा जगण्यासाठी हसा हा कार्यक्रम तसेच, शाहीरी पोवाडे आदी कार्यक्रम घेवून या उत्सवाला संयोजकांनी सामाजिकतेची किनार दिली आहे.