Kolhapur: दारूभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या एक्साइजच्या पथकावर हल्ला, उपनिरीक्षकासह जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:31 IST2025-01-21T18:30:50+5:302025-01-21T18:31:23+5:30
कोल्हापूर : मोतीनगर येथे गावठी दारूभट्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साइज) पथकावर स्थानिकांनी हल्ला केला. सोमवारी ...

Kolhapur: दारूभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या एक्साइजच्या पथकावर हल्ला, उपनिरीक्षकासह जवान जखमी
कोल्हापूर : मोतीनगर येथे गावठी दारूभट्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साइज) पथकावर स्थानिकांनी हल्ला केला. सोमवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या घटनेत एक्साइजमधील महिला उपनिरीक्षकासह एक जवान जखमी झाला. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तीन महिलांसह चौघांना अटक झाली.
बेकायदेशीर गावठी दारूच्या हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी एक्साइजचे पथक मोतीनगर येथे गेले होते. पथकाने कारवाई सुरू करताच काही महिला आणि पुरुषांनी विरोध केला. दोन महिला वाहनांच्या आडव्या पडल्या. त्यांना उठवताना पथकातील जवान आणि स्थानिकांमध्ये जोरदार झटापट झाली. स्थानिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत उपनिरीक्षक कोमल यादव आणि जवान राहुल गुरव जखमी झाले. झटापटीत विरोध करणारी एक महिला बेशुद्ध पडल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली.
दरम्यान, एक्साइजच्या अधिकाऱ्यांनी राजारामपुरी पोलिसांना कळवले. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चार महिलांना ताब्यात घेतले. कारवाईसाठी गेलेल्या पथकावरच हल्ला झाल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
यांना झाली अटक
रिया विजय अभंगे (वय १९), रेखा विजय अभंगे (३७), नितू गणेश पाटील (४५) आणि विजय कांती अभंगे (४२, चौघे रा. मोतीनगर, कोल्हापूर) यांना पोलिसांनी अटक केली. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान राहुल सदाशिव गुरव (वय ३८) यांनी फिर्याद दिली.
दोन्ही यंत्रणा धास्तावल्या
कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाल्याने एक्साइजच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यापासून ते फिर्याद देण्यापर्यंत वरिष्ठ अधिकारी स्वत: उपस्थित होते. हद्दीत दारू भट्ट्या सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने राजारामपुरी पोलिसांचीही पंचाईत झाली.
धाडस का वाढले?
निवडणूक काळात पोलिस आणि एक्साइजच्या पथकांनी गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. काही दिवसांत त्या कोणाच्या आशीर्वादाने पुन्हा सुरू झाल्या, याचा शोध घेण्याची गरज आहे. अवैध व्यावसायिकांना बळ देणाऱ्या छुप्या यंत्रणांमुळेच त्यांचे पथकांवर हल्ला करण्याचे धाडस वाढल्याचे बोलले जात आहे.