गोकुळ शिरगावजवळ साडेबारा लाखांचा मद्यसाठा जप्त
By उद्धव गोडसे | Updated: May 22, 2023 19:07 IST2023-05-22T19:07:26+5:302023-05-22T19:07:40+5:30
नाशिकमध्ये विक्रीसाठी घेऊन जाणारा गोवा बनावटीच्या मद्याचा ट्रक पकडून त्यातील साडेबारा लाखांचे मद्य जप्त करण्यात आले.

गोकुळ शिरगावजवळ साडेबारा लाखांचा मद्यसाठा जप्त
कोल्हापूर : नाशिकमध्ये विक्रीसाठी घेऊन जाणारा गोवा बनावटीच्या मद्याचा ट्रक पकडून त्यातील साडेबारा लाखांचे मद्य जप्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. २२) सकाळी सातच्या सुमारास पुणे-बेंगळुरू महामार्गावर गोकुळ शिरगाव येथे ही कारवाई केली. ट्रकचालक किरण ज्ञानेश्वर कोकाटे (वय २८) आणि स्वप्नील बाळू कोरडे (वय २८, दोघे रा. इंदोरे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) या दोघांना पथकाने अटक केली.
तिलारी घाटमार्गे गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सोमवारी सकाळी महामार्गावर गोकुळ शिरगावच्या हद्दीत सापळा रचला. किरण हॉटेलजवळ संशयास्पद आयशर ट्रक थांबवून झडती घेतली असता, त्यात गोवा बनावटीचे १२ लाख ६२ हजार ४०० रुपयांचे मद्याचे १५० बॉक्स आढळले. मद्य वाहतुकीची कोणतीही अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नसल्याने पथकाने मद्यासह सात लाखांचा ट्रक असा सुमारे १९ लाख ६२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर मद्याची अवैध वाहतूक करणारे किरण कोकाटे आणि स्वप्नील कोरडे या दोघांना अटक केली.