कृषी विभाग अखेर झाला जागा; कोल्हापुरात तेरा भरारी पथकांद्वारे लिंकिंग तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:12 IST2025-01-13T15:11:54+5:302025-01-13T15:12:22+5:30
दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश : गुणनियंत्रण निरीक्षकांवर जबाबदारी

कृषी विभाग अखेर झाला जागा; कोल्हापुरात तेरा भरारी पथकांद्वारे लिंकिंग तपासणी
कोल्हापूर : युरियासह इतर खतांवर शेतकऱ्यांना नको असणारी रासायनिक खते माथी मारली जात आहेत. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी लिकिंग करणाऱ्याविरोधात कारवाईचे आदेश दिले असतानाही राजरोसपण लिकिंग दिले जाते, हा विषय ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर कृषी विभागाला अखेर जाग आली. त्यांनी जिल्ह्यात तेरा भरारी पथकाद्वारे घाऊक व किरकोळ खतविक्रेत्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसात याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.
खत उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना नको असणारी खते विक्रेत्यांच्या माध्यमातून देतात, या तक्रारीबद्दल दि. ६ जानेवारी रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी खत कंपन्या व विक्रेत्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात घेतली होती. लिकिंग करणाऱ्याविरोधात थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तरीही, कंपन्यांची मग्रुरी वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
याबाबत, ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविल्यानंतर कृषी विभागाने तपासणीचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील सर्व गुणनियंत्रण निरीक्षकांना तपासणी करण्याचे आदेश काढले. त्यानुसार तेरा भरारी पथकामार्फत विक्रेत्यांची तपासणी सुरू झाली आहे. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी सारिका रेपे, मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतीश देशमुख हे उपस्थित होते.
‘आरसीएफ’, ‘चंबळ’ वर नजर
दोन-तीन दिवसांपूर्वी लागलेल्या रेकमध्ये ‘आरसीएफ’ व ‘चंबळ’ या खत उत्पादक कंपनीचे खत वाटप सुरू आहे. खत उपलब्ध झालेल्या विक्रेत्यांची तपासणी सुरू असून, त्यांनी काही लिकिंग दिले का? याची माहितीही घेतली जात आहे.
रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यासाठी खतांची उपलब्धता व वाटपाबाबत नियोजन करण्यात आले असून, मंजूर आवंटनाप्रमाणे खताची पुरेशी उपलब्धतता आहे. - सारिका रेपे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद