'कोल्हापुरी'चे जीआय टॅगचे स्वामित्व लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 17:07 IST2025-08-02T17:06:43+5:302025-08-02T17:07:06+5:30

मुंबई : कोल्हापुरी चप्पल या महाराष्ट्र व कर्नाटकातील पारंपरिक आणि ऐतिहासिक पादत्राणास जीआय टॅग प्राप्त आहे. या जीआय टॅगचे ...

Lidcom and Lidkar Corporation own the GI tag of Kolhapuri | 'कोल्हापुरी'चे जीआय टॅगचे स्वामित्व लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेच

'कोल्हापुरी'चे जीआय टॅगचे स्वामित्व लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेच

मुंबई : कोल्हापुरी चप्पल या महाराष्ट्र व कर्नाटकातील पारंपरिक आणि ऐतिहासिक पादत्राणास जीआय टॅग प्राप्त आहे. या जीआय टॅगचे अधिकृत नोंदणीकृत स्वामित्व संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अँड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (लिडकॉम) आणि डॉ. बाबू जगजीवनराम लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (लिडकर) या दोन महामंडळाकडेच असल्याचे दोन्ही महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी स्पष्ट केले आहे.

जून २०२५ मध्ये, इटलीच्या प्रसिद्ध 'प्राडा' ब्रँडने पुरुषांसाठी आपले 'स्प्रिंग/ समर' कलेक्शन सादर केले. या फॅशन शोमध्ये मॉडेलने परिधान केलेल्या लेदर सँडल्सचे डिझाइन महाराष्ट्रातील पारंपरिक आणि जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चप्पलप्रमाणे अत्यंत साम्य दर्शवणारे असल्याचे निदर्शनास आले.

या घटनेनंतर समाज माध्यमांवर व पारंपरिक कारागीर समूहांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर वकिलांच्या एका गटाने भौगोलिक संकेतचिन्हाने (जीआय टॅग) संरक्षित असलेल्या कोल्हापुरी चपलेसारखे डिझाइन वापरून कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल प्राडाला आव्हान देणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

१६ जुलै २०२५ रोजी खंडपीठाने ही जनहित याचिका फेटाळून लावताना असा निकाल दिला की, अशा बाबींसाठी फक्त कोल्हापुरी चपलेच्या जीआय टॅगधारक म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक चर्मोद्योग विकास महामंडळे ही यातील प्रत्यक्ष भागधारक असल्याने, त्यांनाच अशा प्रकारची दिवाणी कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार आहेत. या पार्श्वभूमीवर, लिडकॉम आणि लिडकर महामंडळाने आपली भूमिका संयुक्तपणे स्पष्ट केली आहे.

कोल्हापुरी चप्पलांचा इतिहास हा १२ व्या शतकातील संत परंपरेपासून ते २० व्या शतकातील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रगतिकारक धोरणांशी निगडित आहे. लिडकॉम आणि लिडकर यांचा एकत्रित उद्देश केवळ भौगोलिक संकेताचे संरक्षण करणे नसून, हजारो स्थानिक चर्मकार कारागिरांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि या परंपरेचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ठामपणे ठसा उमटवणे आहे, असे व्यवस्थापकीय संचालक लिडकॉम प्रेरणा देशभ्रतार व व्यवस्थापकीय संचालक लिडकर के. एम. वसुंधरा यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Web Title: Lidcom and Lidkar Corporation own the GI tag of Kolhapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.